70 आणि 80 च्या दशकात कॉमन मॅन पडद्यावर साकारणारे आणि हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले अमोल पालेकर यांना पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. संध्या गोखले यांनी हेदेखील सांगितलं की आहे की आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि काळजीचं काहीही कारण नाही.
ADVERTISEMENT
त्यांना नेमकं काय झालं आहे असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी विचारला तेव्हा संध्या गोखले म्हणाल्या की, ‘अमोल पालेकर यांना अतिधूम्रपान केल्याने याआधी म्हणजे 10 वर्षांपूर्वीही रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताही त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’ यापेक्षा जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
अमोल पालेकर यांनी 70 आणि 80 चं दशक आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवलं आहे. एकीकडे अमिताभ, राजेश खन्ना यांच्यासारखे सुपरस्टार असताना दुसरीकडे अमोल पालेकर हे गोलमाल, छोटीसी बात, रजनीगंधा, चितचोर यांसारख्या चित्रपटांमधून सामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करत होते. त्यांचा छोटीसी बात हा सिनेमा तर फारच गाजला. फक्त हिंदीच नाही तर मराठी सिनेमातही त्यांनी कामं केली आहेत. आक्रित या सिनेमात त्यांनी साकारलेला खलनायक आजही लोकांच्या स्मरणात आहे.
त्यांनी सोनाली बेंद्रे नायिका असलेल्या अनाहत आणि शाहरूख खान राणी मुखर्जी यांची भूमिका असलेला पहेली या सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी आपला असा एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. तसंच त्यांचे सिनेमा हे अत्यंत हलकेफुलके आणि मनाला भावणारे होते. अमोल पालेकर हे सिनेमा विश्वात येण्यााधी बँक ऑफ इंडियात क्लार्क म्हणून कामही करत होते.
वास्तववादी नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. त्यांनी रंगभूमीवरही आपल्या खास अभिनयाने छाप सोडली आहे. काळा वजीर पांढरा घोडा, गार्बो, गोची, पार्टी, पुनश्च हरी ओम, मुखवटे, राशोमान, वासनाकांड या नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका आजही आपल्या स्मरणात आहेत. तसंच पगला घोडा, आधे अधुरे, हयवदन या हिंदी नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत.
आक्रीत, धूसर, ध्यासपर्व, अनाहत या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं असून थोडासा रूमानी हो जाए आणि पहेली हे हिंदी सिनेमाही त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अनिकेत नावाची नाट्यसंस्थाही त्यांनी सुरू केली होती.
ADVERTISEMENT