विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, अभ्यासक व संशोधक अशी मनोहर म्हैसाळकर यांची साहित्य क्षेत्रात ओळख होती.
ADVERTISEMENT
मनोहर म्हैसाळकर यांचं साहित्यात मोलाचं योगदान
मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत होते. वाड्मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
मनोहर म्हैसाळकर किडनीच्या आजाराने त्रस्त
किडनीच्या आजाराने मनोहर म्हैसाळकर त्रस्त होते. १३ तारखेला त्यांना नागपूरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर म्हैसाळकर यांच्या पश्चात त्यांच्या दोन दोन मुली, जावई, बहीण, भाऊ आणि नातवंडं असा बराच मोठा परिवार आहे.
साहित्यासह सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा
साहित्यासह सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा मनोहर म्हैसाळकर यांनी उमटवला होता. आपल्या कुशल संघटन कौशल्यानं त्यांनी साहित्य संघाला नवं भव्य रूप दिलं होतं.
मनोहर म्हैसाळकर यांचा परिचय
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मनोहर म्हैसाळकर यांचा जन्म अमरावतीला झाला होता. त्यांचं शिक्षण बीकॉम पर्यंत अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयमध्ये झाले होते. त्यानंतर ते नागपूरला काही काळ सोमलवार हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यानंतर त्यांनी मॉइल मध्ये नोकरी केली आणि मॉइलमधून सेवानिवृत्ती झाले.
१९७२ साली त्यांचा विदर्भ साहित्य संघमध्ये प्रवेश झाला. १९८३ पर्यंत त्यांनी विविध पदे भूषविली. त्यानंतर १९८३ ते २००६ पर्यंत ते सरचिटणीस होते. २००६ ते आजपर्यंत त्यांनी विदर्भ साहित्य संघातचे अध्यक्ष पद भूषवलं. रंजन कला मंदिरामध्ये ते सक्रिय होते. रंजन कला मंदिरचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांनी काम केले. स्वरसाधना या संगीतसंस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केले.
संगीत, क्रिकेट नाटक आणि तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांमध्ये ते अग्रेसर होते. १९७२ पासून त्यांनी स्वतःला विदर्भ साहित्य संघ साठी वाहून घेतले होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते ख्यातकीर्त होते. विदर्भ साहित्य संघ कार्यकर्त्यांच्या,साहित्यिकांच्या तीन पिढ्या त्यांनी घडवल्या. विदर्भ साहित्य संघाने २००७ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर आयोजित केले होते. यंदाचे हे वर्ष विदर्भ साहित्य संघाचे शतक महोत्सवी वर्ष आहे आणि शतक महोत्सवी वर्षाच्या या कार्यक्रमांमध्ये सातत्याने वेगळे असायचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अनेक महत्त्वाच्या गोष्टी करायचे त्यांच्या मनामध्ये होते.
विदर्भ साहित्य संघाच्या जुन्या वास्तू पासून नवीन वास्तू पर्यंतच्या प्रवसाचे ते साक्षीदार होते. तसेच विदर्भ साहित्य संघाच्या हिरक महोत्सव, अमृत आणि शतक महोत्सव चे ते साक्षीदार होते. गुरुवारी त्यांच्या प्रकृती मध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्यांना विवेका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली अर्चना देव, मंजू घाटे, जावई न्या. रोहित देव असाच बराच आप्तपरिवार आहे.
ADVERTISEMENT