दोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यात विध्वंस घालणाऱ्या पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी तडाखा दिला. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून, काही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली, तर काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पावसानंतर पुरात वाहून जाणारं सोयाबीनचं पीक बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. यामुळे दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या शेतमालाची माती झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, त्यामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढुर, डोंगरगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे ढीग कयाधू नदीला आलेल्या पुरात वाहून जात असल्याची दृश्ये समोर आली आहेत. यात एक शेतकरी शेतात जमा केलेल्या सोयाबीनचा ढीग वाचवण्यासाठी थेट पुरात उतरल्याचाही व्हिडीओ समोर आला आहे.
कयाधूच्या पुरात वाहून जात असलेला सोयाबीनचा ढीग बाहेर काढण्यासाठी शेतकरी रौद्रवतार घेतलेल्या कयाधूच्या नदीपात्रात उतरला. त्यानंतर सोयाबीनचा ढीग अडवून नदीपात्राबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, या शेतकऱ्यांला सोयाबीनचा ढीग बाहेर काढताच आला नाही.
सोयाबीनचा ढीग बाहेर काढण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्याला स्वतःच्या जिवाला मुकावं लागतं की, काय अशी परिस्थिती होती. मात्र, गावकऱ्यांनी वेळीच प्रसगांवधान दाखवत शेतकऱ्याला पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. शेतकरी सुखरूप असून, त्यानंतर त्याला घरी घेऊन जाण्यात आलं. दरम्यान, कालपासून जिल्ह्यात पावसाने सलग हजेरी लावल्याने सोयाबीन, तूर, कापूस या पिकांसोबत हळदीच्या पिकाचंही प्रचंड नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT