Vidhan Sabha Live : आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवर रंगू शकते चर्चा

मुंबई तक

• 04:40 AM • 05 Jul 2021

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाचं अधिवेशन हे फक्त दोन दिवसांचं ठेवलेलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची ईडी चौकशी हे विषय गाजत आहेत. सरकारने अधिवेशनाचा दोन दिवस ठेवला असला तरीही विरोधकांनी महत्वाच्या मुद्द्यांवरुन पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाचं अधिवेशन हे फक्त दोन दिवसांचं ठेवलेलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची ईडी चौकशी हे विषय गाजत आहेत. सरकारने अधिवेशनाचा दोन दिवस ठेवला असला तरीही विरोधकांनी महत्वाच्या मुद्द्यांवरुन पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची तयारी ठेवली आहे.

हे वाचलं का?

दोन दिवसांच्या अधिवेशनात हे मुद्दे गाजू शकतात –

१) विधानसभा अध्यक्षांची निवड – नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीशिवाय होणारं हे दुसरं अधिवेशन ठरणार आहे. अध्यक्षांची निवड व्हावी यासाठी विरोधी पक्षातील भाजपसह सत्ताधारी पक्षातील काँग्रेसही आग्रही होतं. मध्यंतरी भाजपने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत या प्रकरणी निवेदन दिलं होतं. परंतू मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर देताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनातही अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता कमीच आहे.

Monsoon Session 2021 : विरोधी पक्षाच्या उद्योगांचीही भांडाफोड होणं गरजेचं,शिवसेनेचा भाजपवर निशाणा

२) महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप –

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी चौकशी, अनिल परब यांच्यावर झालेले आरोप, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी विकत घेतलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेली कारवाई हे मुद्दे पुन्हा एकदा आजच्या अधिवेशनात गाजू शकतात.

३) कोरोनाकाळातली परिस्थिती –

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असली तरीही भविष्यताली तिसऱ्या लाटेचा धोका आणि कोरोना मृत्यूच्या आकड्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.

४) मराठा – ओबीसी आरक्षण –

सुप्रीम कोर्टाने मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात एक नवीन संघर्ष पहायला मिळतो आहे. आरक्षण देण्याचं काम आता केंद्र सरकारकडे असल्याचं सांगत राज्य सरकारने भाजपवर पलटवार केला आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेला एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारकडून येत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha Live : यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे ! अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

५) स्वप्नील लोणकर आत्महत्या आणि MPSC चे प्रलंबित प्रश्न –

पुण्यात MPSC ची परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणानंतर राज्यातील MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक जणांच्या परीक्षा होऊनही मुलाखती होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आलं आहे. अशा परिस्थितीत MPSC चा कारभार सुधारण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षानेही केली आहे. या प्रकरणावरुन आज अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.

याव्यतिरीक्त केंद्र सरकारचा कृषी कायदा, राज्यपालांकडे प्रलंबित असलेली १२ आमदारांच्या नावाची यादी हे विषयही आज अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार मांडणार ‘ही’ विधेयकं

    follow whatsapp