मुंबई: मुंबईनजीकच्या विरारमध्ये आज (23 एप्रिल) पहाटे तीन वाजेच्या सुमारास विजय वल्लभ या हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. आता या तेराही मृत रुग्णांच्या नावाची यादी देखील समोर आली आहे. या भीषण आगीमध्ये रुग्णालयातील 9 पुरुष आणि 4 महिलांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
विजय वल्लभ हॉस्पिटलमधील आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नावाची यादी
1. सुप्रिया देशमुख (महिला, वय 43 वर्ष)
2. नरेंद्र शंकर शिंदे (पुरुष, वय 58 वर्ष)
3. निलेश भोईर (पुरुष, वय 35 वर्ष)
4. पुखराज वल्लभदास वैष्णव (पुरुष, वय 68 वर्ष)
5. रजनी आर कुडू (महिला, वय 60 वर्ष)
6. सुवर्णा सुधाकर पितळे (महिला, वय 65 वर्ष)
7. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पुरुष, वय 63 वर्ष)
8. कुमार किशोर दोशी (पुरुष, वय 45 वर्ष)
9. रमेश थौडा उपयन (पुरुष, वय 55 वर्ष)
10. उमा सुरेश कंगुटकर (पुरुष, वय 63 वर्ष)
11. अमेय राजेश राऊत (पुरुष, वय 23 वर्ष)
12. शमा अरुण म्हात्रे (महिला, वय 48 वर्ष)
13. प्रविण शिवलाल गौडा (पुरुष, वय 65 वर्ष)
या आगीची माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी आगीचं स्वरुप अत्यंत भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना ती विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही आग अटोक्यात आली.
पण दुर्दैवाने या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, इतर 5 ते 6 रुग्णांना वाचविण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आगीचं नेमकं कारण काय?
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किंटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय या हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिट देखील झालं नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत अद्याप विरार महापालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच अग्निशमन दलाकडून आगीचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात येईल. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त करत हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप तरी प्रशासनाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT