त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील काही शहरांत बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, अमरावती, नांदेड आणि मालेगावात बंदला हिंसक वळण लागलं. तिन्ही शहरांत दगडफेक करण्यात आली. सध्या अमरावती वगळता नांदेड, मालेगावात दुसऱ्या दिवशी शांतता असून, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
‘त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावं’, असं निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केलं. ‘राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा’, असं कळकळीचं आवाहन गृहमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.
‘यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
‘त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काही संघटनांनी निवेदन देण्याची परवानगी मागितली होती. निवेदन द्यायला जात असताना काही लोकांनी दगडफेक करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज भाजपने बंद पुकारला होता. या बंद दरम्यान शांततेनेच मोर्चा होईल अशी अपेक्षा होती. पण त्यात काही अप्रिय घटना घडल्या. दगडफेक करून मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असंही गृहमंत्री म्हणाले.
अशोक चव्हाणांनी केलं शांतता पाळण्याचं आवाहन
‘त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचं आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचं पालन करावं, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं.
Maharashtra violence : अमरावतीत पुन्हा हिसेंचा भडका; दगडफेक-जाळपोळ, संचारबंदी लागू
‘माझी सर्व अमरावतीकरांना विनंती…’
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांवर चिंता व्यक्त करत नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
‘अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे, त्यांनी शांतता आणि संयम पाळावा. माध्यमांनीही दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवताना त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.’
अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक
‘परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागेल याची काळजी आपण सर्व जण घेऊया’, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT