मेडीकल दुकानावर धाड मारुन पोलीस असल्याचा बनाव करत व्यवसायिकाचं अपहरण करणाऱ्या Tiger Group च्या सहा जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तुमच्या दुकानात गर्भपाताच्या गोळ्या कशा काय? असा प्रश्न विचारत कारवाईसाठी दुकानात घुसलेल्या आरोपींनी मेडीकल दुकानाचे मालक बेलीराम अगरवाल यांना पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात चला असं सांगून आपल्यासोबत आणलं.
ADVERTISEMENT
यानंतर या सहा आरोपींनी अगरवाल यांच्याकडे सहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. वाकड पोलिसांनी कारवाई करत या सहाही आरोपींना अटक केली असून मेडीकल दुकानाचे मालक बेलीराम अगरवाल यांची सुटका केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी काही अनोळखी व्यक्ती अगरवाल यांच्या मेडीकल दुकानात घुसल्या. यानंतर त्यांनी तुमच्या दुकानात गर्भपाताच्या गोळ्या कशा काय असं म्हणून आम्ही पोलीस आहोत असं सांगून चौकशीला सुरुवात केली.
हातात दोन फाईल घेऊन तपास करत असल्याचं नाटक करत या आरोपींनी मेडीकलमध्ये थोडा वेळ घालवला. गर्भपाताच्या गोळ्या ठेवल्याप्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते असं सांगत हे आरोपी अगरवाल यांना पुढील तपासासाठी पोलीस चौकीत चला असं सांगून घेऊन गेले. यावेळी दत्त मंदीर वाकड रस्त्यावर फिरवून आरोपींनी हे प्रकरण मिटवायचं असेल तर एक तासात सहा लाख रुपयांची मागणी केली.
अगरवाल यांचं मेडीकल ज्या स्पंदन हॉस्पिटलच्या आवारात आहे त्या हॉस्पिटलचे मालक डॉ. अभिनव खरे यांना फोन करुन आरोपींनी धमकावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यावेळी पुण्यात नसलेल्या डॉ. खरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फोन करुन तुमचे अधिकारी कारवाईसाठी आले आहेत का अशी चौकशी केली. वाकड पोलिसांनी नाही असं उत्तर देताच…खरा प्रकार समोर आला. अखेरीस पोलिसांनी एक पथक घटनास्थळी रवाना केलं.
पोलीस पथक येताच हे आरोपी पळून जायला लागले…पण पोलिसांनी पाठलाग करत या सहाही आरोपींना पकडलंय. आरोपींमध्ये टायगर ग्रूपचा पिंपरी-चिंचवडचा अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, प्रीतेश लांडगे, राहुल लोंढे, प्रकाश सजगाणे, कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ, आकाश हारकरे यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT