NCB चे विभागी संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोदात पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरही नवाब मलिक आपल्या परिवाराची बदनामी करत असल्याचा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. याआधी झालेल्या सुनावणी नवाब मलिकांच्या वकीलांनी ९ डिसेंबरपर्यंत मलिक वानखेडे परिवाराबद्दल काहीही बोलणार नाहीत असं सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
गेल्या आठवडाभरात मलिक यांनी तीनवेळा आपल्या परिवाराची बदनामी केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. जस्टीस शाहरुख काठावाला आणि जस्टीस मिलींद जाधव यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
२५ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने नवाब मलिकांवर जोरदार ताशेरे ओढले होते. ज्यावेळी नवाब मलिकांच्या वकिलांनी हायकोर्टात वानखेडे परिवाराबद्दल नवाब मलिक ९ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीही बोलणार नाहीत असं सांगितलं होतं. यानंतर नवाब मलिक यांनी दोन पानी प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर सादर केलं ज्यावर ज्ञानदेव वानखेडे यांची संमती घेण्यात आली. वानखेडेंनी याला संमती दिल्यानंतर हायकोर्टाने दुसऱ्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी वेळ ठरवला. तोपर्यंत नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट न करण्याचं मान्य केलं.
याआधी जस्टीस माधव जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने नवाब मलिकांना ट्विट करताना पहिले खातरजमा करण्यासाठी सांगितलं होतं. समीर वानखेडे हे सरकारी नोकर आहेत ज्यामुळे नवाब मलिक हे त्यांच्याविरुद्ध बोलू शकतात असंही हायकोर्टाने सांगितलं होतं. परंतू यानंतर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने जस्टीस जामदार यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय रद्द ठरवला होता.
दिवाळीतील सुट्टीदरम्यान ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा केला होता. जस्टीस जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत नवाब मलिकांनी ट्विट करण्याआधी खातरजमा करावी असा आदेश हायकोर्टाने दिला होता. वानखेडे यांनी जस्टीस जामदार यांच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
ADVERTISEMENT