रत्नागिरी – राजापूर येथील रिफायनरी प्रोजेक्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पाठींबा दर्शवला. सुरुवातीला नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंचं नंतर परिवर्तन कसं झालं असा सवाल आता विचारला जात आहे. शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंना कोकणातील रोजगाराची चिंता आहे की नाणारमध्ये जमिनी घेतलेल्या गुजराती भूमाफियांची असा प्रश्न विचारला होता. अशातच नाणार प्रकल्पविरोधी समितीचे प्रमुख अशोक वालम यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करत…आम्हाला गोळ्या घालून नाणार प्रकल्प राबवणार आहात का असा सवाल विचारला आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!
“नाणारमध्ये येऊन राज ठाकरेंनी १० हजार लोकांपुढे हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असं सांगितलं होतं. मुंबईतल्या BKC येथील हिरे व्यापाऱ्यांनी नाणारमध्ये जवळपास ९०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांचा पैसा इथे अडकल्यामुळे ते राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत. आजही स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. कोकणात जर रोजगार आणायचा असेल आणि राजकीय नेत्यांना जर आमची चिंता असेल तर कोकणात उत्पादन होणाऱ्या आंबा, काजू, फणस, रातआंबे, बांबू यासारख्या उत्पादनांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आणावेत. पर्यटनाच्या माध्यमातूनही कोकणात विकास करता येऊ शकतो. त्याचं आम्ही स्वागतच करु. परंतू गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांचे अडकलेले पैसे सोडवण्यासाठी तुम्ही रिफायनरीला पाठींबा देणार असाल तर तिकडे असलेल्या हजारो लोकांचे तुम्ही बळी घेणार आहात का? आमच्यावर गोळ्या घालून तो प्रकल्प राबवणार आहात का? याचंही उत्तर राजकीय नेत्यांनी द्यावं”, अशी मागणी अशोक वालम यांनी केली आहे.
दरम्यान मनसे यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांना पत्र लिहत रत्नागिरी – राजापूर प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नसल्याचं म्हटलं होतं. कोकणातील तरुण नोकरी-धंद्यासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागत आहे. पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं, परंतू यादृष्टीने विचार झालाच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रकल्पांमुळे उद्योग निर्माण होतील आणि स्थानिक तरुणांना इथे जास्तीत जास्त संधी मिळेल. प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय चिंता मी देखील समजू शकतो. परंतू जैतापूर प्रकल्पाच्या वेळी मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी बोलून माझ्या मनातल्या शंका दूर केल्या. याच पद्धतीने तज्ज्ञांशी संवाद साधून कोकणाचं पर्यावरणाच्या दृष्टीने नुकसान होणार नाही हे पहायला हवं असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
गुजराती भूमाफियांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करतायत का?
ADVERTISEMENT