मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. मी आता फक्त लॉकडाउनचा इशारा देतोय, पुढील दोन दिवसांमध्ये मी तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करणार आहे. जर दुसरा पर्याय मिळाला नाही तर मग आपल्याला लॉकडाउन करावंच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज्यातील वाढत असलेली रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण इथपासून ते टीका करणाऱ्या विरोधकापर्यंत ते सल्ले देणाऱ्या उद्योगपतींचाही समाचार घेतला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला दिल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या ट्विटर हँडलवर पाश्चिमात्य देशांनी लॉकडाउन काळात लोकांची व आपल्या देशातील रोजगाराची कशी काळजी घेतली याचे दाखले दिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांमध्येही दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लॉकडाउन लावण्यात आल्याचं सांगितलं होतं.
यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना गेल्या वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत आणि पुन्हा रस्त्यावर येऊन लोकांना समजावून सांगण्यासाठी, त्यांच्या मदतीला धावून जाण्याचीही तयारी असल्याचं म्हणत टोला लगावला.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही फडणवीसांना…तुम्ही नमूद केलेले पैसे हे त्या देशातील केंद्र सरकारने दिले आहेत. आपलं केंद्र सरकार काय देणार…अजुन राज्याच्या हक्काचे पैसे मिळत नाहीयेत. बघा काही मिळतं का तुमचं वजन वापरुन असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मास्क न लावण्यात काय शौर्य आहे?’
दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समाचार घेतला. ‘अनेक जणांना वाटतं की मास्क का लावतोय तू? मास्क न लावण्यात काय शौर्य आहे? मी मास्क वापरत नाही, मी मास्क वापरणार नाही… काय शूर आहेस? मास्क न वापरणं या शूरता नाही. मास्क लावायला लाजण्याची गरज नाहीए. परत एकदा सांगतो लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावायलाच पाहिजे.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
त्यांना माझा नमस्कार आहे ! उद्धव ठाकरे राजना असं का म्हणाले??
ADVERTISEMENT