– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी
ADVERTISEMENT
चोरांवर नजर ठेवण्यासाठी किंवा एखाद्या क्षेत्रात कायदा-सुव्यवस्थेचं पालन होतंय की नाही यावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती केली जाते. परंतू अनेकदा एखाद्या घटनेदरम्यान किंवा गुन्ह्याच्या जागी पोलीस उशीरा पोहचत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचं आपण पाहिलं आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे.
जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंगव असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता QR कोडद्वारे हजेरी नोंदवावी लागणार आहे. यासाठी पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी वाशिम जिल्ह्यातील शहर आणि गावातील महत्वाच्या ३७०० ठिकाणांवर QR कोड लावला आहे.
ज्या-ज्या ठिकाणी हे कोड लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तो कोड स्कॅन करुन आपली हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पोलिसांनी हा QR कोड स्कॅन केल्यानंतर त्यांची सर्व माहिती ही दृष्टी नामक एका मोबाईल App मध्ये जमा होणार असून यानंतरच्या त्यांच्या कामकाजावर थेट एसपी आपल्या कार्यालयातून नजर ठेवू शकणार आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांना हा QR कोड फक्त स्कॅन करायचा नसून या समोर उभं राहून आपला सेल्फीही दृष्टी या मोबाईल अॅपवर टाकायचा आहे. जो कोण कर्मचारी आपली हजेरी या QR कोडद्वारे नोंदवणार नाही त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. परंतू अद्याप अशी वेळ आलेली नसून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं बच्चन सिंग यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं.
या QR कोडबद्दल बच्चन सिंग यांना विचारलं असता ते म्हणाले, “पेट्रोलिंगची प्रक्रीया सर्वसमावेशक व्हावी यासाठी आम्ही ही QR कोडची सिस्टीम राबवत आहोत. या सिस्टीमद्वारे आमचे पोलीस कर्मचारीही अधिक सजग झाले आहेत. या माध्यमातून एखाद्या भागातील असामाजिक तत्वांवर पोलिसांचा चांगला वचक राहील अशी आम्हाला आशा आहे”, वाशिम पोलिसांच्या या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय.
बुलढाणा : गळफास घेताना सेल्फी घेत विवाहीतेची आत्महत्या, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT