– मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनिधी
ADVERTISEMENT
मे महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्वाचं शहर असलेल्या कल्याणच्या मानिवली गावात ग्रामस्थांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी गत या ग्रामस्थांची झाली आहे.
गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना गावात मंजूर झाल्या. परंतू पाठपुरावा न झाल्यामुळे यातली एकही योजना गावकऱ्यांच्या नशिबात आलेली नाही. रोजची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बोअरवेल, विहीर तर कधी थेट नदीतलं पाणी पिण्याच्या टाकीत चढवलं जातं. परंतू हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा बरीच कसरत करावी लागते.
आतापर्यंत अनेक आमदार-खासदार येऊन गेले परंतू पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजुनही कायम राहिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. हंडा, कळशी, ड्रम मिळेल ते साहित्य घेऊन या गावातील नागरिक दररोज दोन किलोमीटरचा प्रवास करत पाणी भरण्यासाठी जातात.
500 ते 550 घर असलेल्या मानिवली गावात अडीच हजारांच्या घरात लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावाचा कारभार चालवला जातो. परंतू प्रत्येक वेळी शासकीय योजना गावात आणायचं म्हटलं की कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे कधीच कारवाई होत नाही. उन्हाळ्यात तर प्रत्येक घरातली व्यक्तीचा अर्धा दिवस हा पाणी भरण्यातच वाया जातो अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली. निवडून आलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना शासन दाद देत नसल्यामुळे आता कोणाकडे मदत मागायची असा प्रश्न इथल्या लोकांना पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शासन या गावाची तहान भागवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT