शिवसेना वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला स्वबळावरुन दिलेला टोला आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना भाजपशी पुन्हा युती करण्याचा दिलेला सल्ला….या दोन घटनांवरुन राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे. सरनाईकांच्या पत्रानंतर राज्यात सेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलेलं असताना काँग्रेसनेही स्वबळाचा नारा कायम ठेवला आहे.
ADVERTISEMENT
“भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही सरकारमध्ये आलो आहोत. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सरकार बनण्याआधी हेच सांगितलं होतं. कुठेही आम्ही पर्मनंट मेंबर आहोत असा उल्लेख नव्हता. महाविकास आघाडी ही पाच वर्षांसाठी तयार झाली आहे, कायमस्वरुपाची नाही. पक्षाची ताकद वाढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. काँग्रेससोबत भाजपनेही स्वबळाचा नारा दिला आहे. याआधीही भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढले आहेत. त्यामुळे यात गैर काहीच नाही.” प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसची भूमिका मांडली.
स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला मुख्यमंत्र्यांनी काय सुनावलं??
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कमी महत्व मिळत असल्यामुळे नेत्यांची नाराजी गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या स्वबळाच्या नाऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात समाचार घेतला. “सध्याच्या परिस्थितीत संकुचित राजकारण केल्यास त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. काहीजणांना आपण स्वबळावर लढू आणि सरकारला अडचणीत आणू असं वाटत असेल तर ते होणार नाही. आता लोकांसमोर स्वबळाची भाषा करायला गेलात तर ते चपलेने मारतील. सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवत सध्या सर्वांनी कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं.
ADVERTISEMENT