गेल्या काही दिवसांपासून NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत नवाब मलिकांनी आरोपांची राळ उडवली होती. यानंतर मलिकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचेच असताना सोशल मीडियावर ही बाब का समोर आणत आहात, तक्रार करा, असा टोला लगावला. अतुल भातखळकरांच्या या टीकेलाही नवाब मलिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय होतं नवाब मलिकांचं ट्विट –
मलिक यांनी शुक्रवारी संध्याकाळी एक ट्विट करत एका कारमधील काही लोक गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराच्या आणि शाळेच्या आसपास फिरून रेकी करत असल्याचा दावा केला आहे. तसेच, या फोटोतील लोकांना आपली काही माहिती हवी असल्यास थेट मला भेटा, मी त्यांना माहिती देईन, असं देखील नवाब मलिक यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भातखळकरांचा प्रतिप्रश्न –
नवाब मलिकांच्या या ट्विटला उत्तर देताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्विट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही? असा प्रश्न विचारला.
भातखळकरांच्या या टीकेला नवाब मलिकांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. “सोशल मीडियाचा वापर मोदी साहेबांनीच आम्हाला शिकवलाय. या बाबतीत आम्ही त्यांचे शिष्य आहोत. सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुकचा वापर कसा करायचा, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत. विरोधक या बाबतीत इतके तयार झाले आहेत की त्यांना या बाबतीत सोशल मीडियावर चारीमुंड्या चीत केलं जातं. त्याची भिती भाजपाला वाटते. कायदेशीर कारवाई होणारच आहे. पण तुमचं चीलहरण जनतेसमोर होणं गरजेचं आहे. ते आम्ही करतच राहू”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
मी अमित शाहांना तक्रार करणार, अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवलं जातंय – नवाब मलिक
ADVERTISEMENT