ADVERTISEMENT
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
राजकीय पक्षांसह विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या वतीनेही छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवलीतही विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले.
युवासेना उपशहर अधिकारी संदेश हरिश्चंद्र पाटील यांच्या पुढाकाराने डोंबिवली पश्चिममध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र आणि ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं.
या प्रदर्शनाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिवकालीन शस्त्रास्त्र आणि वस्तू प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रांचा समावेश होता.
शिवकालीन दांडपट्टे, धोप, मुल्हेरी मुठीची तलवार, तेगा, उना, गोलिया पद्धतीची तलवार, मराठा कट्यार, विजयनगर कट्यार, बिचवा, खंजीर, अडकित्ता, कर्द, खंजराली, गुप्ती, माडू, परशु, धनुष्यबाण आदी दुर्मिळ शस्त्र लोकांना ‘याची देही,याची डोळा’ पाहायला मिळाली.
लहान- मोठे युवा अशा सर्वच शिवप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनात मोठी गर्दी केली होती.
लोकांना या शस्त्रांची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक शस्त्र आणि वस्तूची सखोल माहिती तसेच त्याचे ऐतिहासिक महत्वही त्याठिकाणी देण्यात आलेलं होतं.
या प्रदर्शनासोबतच शिवश्री यशवंत गोसावी यांच्या शिवचरित्र व्याख्यानाचेही आज आयोजन करण्यात आलं होतं.
याच प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या शस्त्रे पुढील काही छायाचित्रांमध्ये आहेत.
ADVERTISEMENT