गेल्या काही दिवसांपासून राज्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे बरंच मोठं नुकसान झालं. मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेलं पिक वाया गेल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाने काही दिवसांसाठी उसंत घेतलेली असली तरीही पुढचे ५ दिवस राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज दक्षिण कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीनं चक्रीवादळ तीव्र झालं असून त्यानं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. राज्यावर नुकतच आलेलं हे संकट कमी होतं म्हणून की काय तोच, केरळजवळ अरबी समुद्रात एक नवीन संकट उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत याठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा पूर्वेकडे फिरण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना या दहा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस दक्षिण कोकणासह घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT