Pm मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेनेत जवळीक वाढेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई तक

• 10:24 AM • 08 Jun 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेत जवळीक वाढेल का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की राजकारणात जर-तर च्या प्रश्नांना काही अर्थ नसतो. आज घडीला ते सत्तेत आहेत आणि आम्ही विरोधात आहोत ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली असं […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेत जवळीक वाढेल का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की राजकारणात जर-तर च्या प्रश्नांना काही अर्थ नसतो. आज घडीला ते सत्तेत आहेत आणि आम्ही विरोधात आहोत ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली असं मी देखील ऐकलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलं आहे की आमच्यात चांगले संबंध आहेत ही बाब सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमच्या भूमिका बदलल्या आहेत मात्र वैयक्तिक पातळीवर स्नेह असण्यात गैर काय? असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बारा मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्यांबाबत विचारलं असता अनेक विषय राज्याच्या अखत्यारित आहेत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मी PM नरेंद्र मोदींना भेटलो, नवाज शरीफांना नाही-उद्धव ठाकरे

राज्य सरकारने केंद्राकडे 12 मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांची फडणवीसांनी चिरफाड करतानाच काही मागण्यांचं स्वागत केलं. केंद्राकडे ज्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यातील 7-8 मागण्या तर राज्याशीच संबंधित आहे. त्याचा केंद्राशी काहीच संबंध नाही. या सर्व मागण्या केंद्राशी संबंधित असत्या तर बरं झालं असतं. राज्य सरकारने कधीही केंद्राकडे राज्याशी संबंधित मागण्या मांडायच्या नसतात, केंद्राशी संबंधित मागण्याच केंद्राकडे मांडायच्या असतात, असा टोला त्यांनी लगावला.

पदोन्नतीतील आरक्षणाचा केंद्राशी संबंध नाही

पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राशी थेट संबंधित नाही. तो राज्याचा प्रश्न आहे. सरकारने जीआरला स्थगिती दिल्याने हा प्रश्न उद्भवला आहे. तर मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग नेमण्याची गरज असून ही राज्याच्या अख्त्यारीतील बाब आहे. मात्र, राज्य मागासवर्ग आयोगाची नियुक्ती न करता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. देशातील प्रत्येक राज्यात ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ महाराष्ट्रात ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे, असं ते म्हणाले.

मेट्रो कारशेडसाठी राज्याने केंद्रासोबत संवाद सुरू केला आहे. त्याबद्दल आनंद आहे. मेट्रो रेल्वे लवकर सुरू व्हावी ही आमची इच्छा आहे. जीएसटीचा परतावा देण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. तरीही हा मुद्दा केंद्रापुढे मांडण्यात आला आहे, ठिक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही चांगली मागणी आहे. आम्ही या मागणीचं स्वागत करतो. या प्रकरणी सुरू असलेली कोर्टातील केसही संपली आहे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp