PM Modi vs Nitin Gadkari: नागपूर: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे काल (12 डिसेंबर) पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नागपुरात (Nagpur) विविध विकासकामांचं लोकार्पण, भूमिपूजन केलं. बहुचर्चित समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Express Way) लोकार्पणही यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. पण या सगळ्या विकासकामांत चर्चा होतेय ती मोदी आणि नितिन गडकरींची (Nitin Gadkari). पंतप्रधान मोदींनी गडकरींचा जो उल्लेख केला त्याची. आणि या सगळ्याला आता तोंड फोडलं आहे, ते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी. मिटकरींचं म्हणणं काय, नेमकं घडलंय काय तेच आपण आता जाणून घेणार आहोत. (what did narendra modi say about nitin gadkari in nagpur amol mitkari tweet)
ADVERTISEMENT
गेल्या काही काळापासून नितीन गडकरींची विधान खूप चर्चेत असतात. नॅशनल मीडियामध्येही त्याच्या ब्रेकिंग होतात. त्यानिमित्तानं सरकारमध्ये राहून गडकरींनी मोदी सरकारला सुनावल्याच्या चर्चा होत्या. याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं. यानंतर जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना मोदींनी उपस्थितांचा उल्लेख केला. एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नागपूरचे भूमीपूत्र आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नरत असं व्यक्तिमत्त्व अशा शब्दांत केला. पण गडकरींचा जो उल्लेख केला त्यावरूनच चर्चांना उधाण आलंय.
भगतसिंह कोश्यारीचं वादग्रस्त वक्तव्य “छत्रपती शिवराय जुन्या काळातले आदर्श नितीन गडकरी आत्ताचे”
पाहा नेमकं मोदी काय म्हणालेले:
‘मंचावरील विराजमान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, याच भूमीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नरत देवेंद्रजी, नितीनजी, रावसाहेब दानवे आणि भारती ताई.’ अशा एका शब्दात मोदींनी गडकरींचा उल्लेख केला होता.
मोदींनी आपल्या मंत्रीमंडळातील सहकारी आणि नागपूरचे भूमीपूत्र असलेल्या गडकरींचा उल्लेख केवळ नितीनजी असा केला. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं की, ‘मा. श्री नितीन जी गडकरी यांचा ज्याप्रकारे उल्लेख पंतप्रधान मोदीजींनी केला ते कुठल्याही नागपुरकरांना पसंत पडणार नाही .वास्तविक या सर्व कामांसाठी खरी मेहनत ही केवळ आणि केवळ गडकरीजींचीच आहे.’
Nana Patekar : राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी
नरेंद्र मोदींचा हा व्हिडिओ आणि अमोल मिटकरींचं ट्विट आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षापासून नितिन गडकरी हे भाजपकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी अधून-मधून चर्चा जोर धरत असते. त्यामुळेच आता दिल्लीच्या राजकारणात नितिन गडकरींचे पंख कापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मोदींनी काल केलेल्या गडकरींच्या उल्लेखामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT