तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचे विरोधी पक्षावर गंभीर आरोप
ADVERTISEMENT
‘ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडण्याआधीच विरोधकांकडून हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गेली 36 वर्ष या सभागृहात मी पण आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडल्याचं माझ्यासारख्या माणसाने कधी पाहिलं नाही. मी स्वत: आक्रमक आहे, रोखठोक आहे. माझ्या आयुष्यात या गोष्टींमुळे माझं स्वत:चं खूप नुकसान सुद्धा झालं आहे. एकतर मला खोटं बोलायला आवडत नाही आणि दिलेली वेळ टाळणं मला अजिबात आवडत नाही.’
‘असं अनेक वेळा झालेलं आहे की, सत्ताधारी पक्षाने दिलेलं उत्तर विरोधी पक्षाला मान्य नसतं. कार्यक्रम प्रत्येकाचा ठरलेलाच असतो. पण वॉकआऊट करणं हा प्रत्येकाच्या स्ट्रॅटर्जीचा भाग असतो. म्हणून मी प्रस्ताव मंजूर करत असताना याठिकाणी व्यासपीठावर काही सदस्य आले.
‘हे सदस्य आले आणि ते काही लपून राहिलेलं नाही ते संपूर्ण सभागृहाने पाहिलं. या सदस्यांना माईक ओढण्याचा प्रयत्न केला राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. जे काय आक्रमक व्हायचे ते झाले. सभागृहाचं कामकाज मला सुद्धा थोडं कळतं. त्यामुळे मी त्यांना थेट सांगितलं की, तुम्हाला नेम करतोय.’
‘दरम्यान, यापूर्वी देखील असं घडलं आहे की, सभागृहात ताणतणावाची परिस्थिती उद्भवली की, सभागृह 10-15 मिनिटं स्थगित करुन अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतात आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. कधी तोडगा निघतो कधी निघत नाही. हे मी अनेकवेळा पाहिलं आहे.’
‘खरं तर सभागृहाचं कामकाज तहकूब झालं की, तो विषय तिथेच थांबतो. पण एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर मी व्यक्तीश: कोणाशीही कटुता ठेवली नाही. प्रत्येकाला मी भेटतो, प्रत्येकाशी बोलतो. ही माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा आहे. ही आपली खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे आपले संस्कार आहेत.’
‘बऱ्याच वेळा आपणं तत्वज्ञान आणि संस्कृतीच्या गोष्टी करतो. सभ्येतेचा आव आणतो. पण आज मी सभागृहातून बाहेर गेलो. चेंबरमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकदम रागाने लाल-लाल होऊन चेंबरमध्ये आले. ते इथेच चिडलेले होते हे आपण सर्वांनी पाहिलं. ते आले मी त्यांना स्वत: म्हटलं की, या विरोधी पक्षनेते… बसा. ते रागावलेले होते. स्वाभाविक आहे.’
‘चंद्रकांत दादा आणि इतरही काही सीनियर सदस्य आले त्यांनाही मी बाजूला बसवून घेतलं. या सभागृहात असे किती प्रसंग आपण पाहिलेले आहेत. आहे काय त्यात विशेष. पण स्वत: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि सदस्य शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण त्याचवेळी या बाजूचे अनेक सदस्य आतमध्ये आले आणि माझ्या आई-बहिणीवरुन शिव्या देत आत घुसले.’
‘घुसले ते घुसले काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण जसे काही राडेबाज असतात, गावगुंड असतात अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर तुटून पडत होते. मी सातत्याने यांच्या वरिष्ठांना सांगत होतो की, तुम्ही यांना आवरा. आपण बोलू.’
‘पण त्यांची देखील अशी भाषा होती की, आम्ही आवरणार नाही आम्ही तुमच्यावर रागवलेले आहोत. मी सांगितलं… तुम्ही रागात असाल तर भास्कर जाधवला राग कमी आहे काय? हे मी त्यांना हे पण सांगितलं. तुम्ही 50-60 जण एकत्र आलात मी एकटा आहे. मी जे बोललो ते बोललो खोटं बोलणार नाही.’
‘मी सांगितलं एक पाऊलही मी मागे हटणार नाही. काही जण मला सांगायला आले की, भास्कर जाधव सगळे तुमच्यावर चिडलेले आहेत. त्यांच्यामधीच काही माझे मित्र. ते मला मागे ओढत होते. पण भास्कर जाधव अशा प्रसंगाला पाठ दाखवणार नाही. हटलो नाही मी अजिबात.’
‘पण सभागृहातील हा प्रकार अतिशय लांच्छनास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी घटना आहे. प्रश्न काय होता ओबीसी समाजाचा. तुमचा एवढा राग का असावा? एखाद्या ओबीसी समाजाच्या नेत्याने त्यासंबंधी एखादा विषय विस्तृत स्वरुपात मांडला.’
2021 Vidhan Sabha: ‘चेंबरमध्ये घुसून भाजपच्या आमदारांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
‘अशावेळी उदार अंतकरणाने असे प्रस्ताव स्वीकारायला हरकत काय आहे. का आम्ही फक्त ओबीसी समाजाला फक्त बाहेरच आमचं प्रेम दाखवायचं आणि जेव्हा मदत करायची असेल तेव्हा असे धंदे करायचे. काय करायला निघालो आहोत याचा विचार झाला पाहिजे.’
‘आज महाराष्ट्राच्या संस्काराला संस्कृतीला काळीमा फासलेला आहे. दुसरी गोष्ट मला काही मीडियाच्या लोकांनी बाहेर सांगितलं की, भाजपचे लोक असे सांगत आहेत की, भास्कर जाधवांनी आम्हाला वाट्टेल ती शिवीगाळ केली.’
‘आज संसदीय कार्यमंत्र्यांना आदेशवजा सूचना आहे की, यावेळी मघाशी ते म्हणाले तसं म्हातारी मेल्याचं दु:ख पण काळ सोकावता कामा नये. याचा योग्य तो निर्णय व्हायला हवा.’
‘उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये मी दादांना म्हणालो आपण काय करता आहात, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मला जर सरकारने आणि माझ्या नेत्यांनी सहकार्य केलं तर अध्यक्षांचे काय अधिकार असतात ते मी दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. हे मी बोललो.’
‘म्हणून मी जर कुणाला शिवीगाळ केली असेल किंवा एक जरी असंसदीय शब्द वापरला असेल. तर आज संसदीय कार्यमंत्री म्हणून तुम्ही जी शिक्षा त्यांना ठोठावाल ती शिक्षा मी स्वत:हून मला घ्यायला तयार आहे. पण माझी खात्री आहे की, मी एकही शब्द चुकीचा वापरलेला नाही.’
‘मी आहे आक्रमक आहे. पण संसदीय प्रणालीमध्ये ही आजतागायत कधीही असंसदीय शब्द वापरलेला नाही. असं कधीही घडलेलं नाही. पण आजचा दिवस माझ्या आयुष्यात काळा दिवस आहे. लांच्छनास्पद दिवस आहे. त्यासंबंधी आता सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.’ असा संपूर्ण घटनाक्रम भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितला आहे.
ADVERTISEMENT