महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरतोय तो महाराष्ट्रच्या हातून निसटलेला फॉक्सकॉन प्रकल्प. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. त्यासंदर्भातली घोषणाही करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी हा प्रकल्प गुजरातला वळवला गेल्याची बातमी आली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना सुरू झाला.
ADVERTISEMENT
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राकडून गुजरातला, काय आहे क्रोनोलॉजी?
महाराष्ट्रात एक काळ असाही होता की प्रकल्प होतोय म्हणून विरोध व्हायचा आणि त्यावरून राजकारण रंगायचं. एनरॉन, जैतापूर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. मात्र फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात नोकरीच्या १ लाखाहून अधिक संधी घेऊन येणार होता. मात्र ऐनवेळी हा प्रकल्प गुजरातला गेल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केलं? तर शिंदे फडणवीस सरकारने त्यांचं सरकार स्थापन झाल्यापासून हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी काय प्रयत्न केले हे दोन्ही घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत.
Foxconn-vedanta : व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवरील ‘तो’ मेसेज गोंधळ निर्माण करण्यासाठी; आदित्य ठाकरेंचा खुलासा
फॉक्सकॉनच्या बाबतीत घडलेले दोन घटनाक्रम
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय घडलं ? १४५ दिवसांचा घटनाक्रम काय?
5 जानेवारी 2022 : फॉक्सकॉनकडून पहिले पत्र पाठवण्यात आलं.
5 मे 2022 : फॉक्सकॉनकडून दुसरं पत्र पाठवणयात आलं
14 मे 2022 : उद्योग विभागाकडे फॉक्सकॉनने महाराष्ट्रात प्रकल्प यावा यासाठी रितसर अर्ज केला
24 मे 2022 : दावोस येथे प्रतिनिधी मंडळाची वेदांता समूहाशी चर्चा झाली. या यासाठी महाराष्ट्रातून आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असे दोघेही गेले होते.
24 मे 2022 : तळेगाव येथील जागेची पाहणी करण्यात आली. या ठिकाणची जागा अनुकूल आहे अशी पसंतीही कळवण्यात आली.
13 जून 2022 : फॉक्सकॉनला पॅकेज (पण उच्चस्तरिय समिती आणि मंत्रिमंडळ मान्यता नसलेले) देण्याचा निर्णय झाला.
24 जून 2022 : फॉक्सकॉन समूहाच्या अध्यक्षांशी तत्कालिन उद्योगमंत्र्यांची चर्चा झाली. २४ जूनला दिल्लीला जाऊन फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिव्ह आणि त्यांचे सहकारी विन्सेंट ली यांच्याशी सविस्तर चर्चा सुभाष देसाईंनी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यांना निमंत्रण दिलं की आपलं समाधान झालं आहे त्यामुळे तुम्ही मुंबईत येऊन MoU करावा हे सांगितलं.
२४ जूननंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अवघे पाच दिवस होतं. २९ जून २०२२ या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३० जूनला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर फॉक्सकॉनसाठीचा दुसरा घटना क्रम काय?
काय घडलं ६५ दिवसात?
14 जुलै 2022 : वेदांचे चेअरमन अनिल अग्रवाल यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं
15 जुलै 2022 : अनिल अग्रवाल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिलं
26 जुलै 2022 : वेदांता समूहासोबत मुख्यमंत्री कार्यालयात बैठक
27-28 जुलै 2022 : फॉक्सकॉन समूहाची स्थळभेट
5 ऑगस्ट 2022 : अनिल अग्रवाल यांना देवेंद्र फडणवीस भेटले
15 ऑगस्ट 2022 : उच्चाधिकार समितीकडून 38,000 कोटी रुपयांच्या पॅकेजला मान्यता
5 सप्टेंबर 2022 : सामंजस्य करार करण्यासाठी दुसरे स्मरणपत्र देण्यात आलं.
हा होता ६५ दिवसांचा घटनाक्रम. महाराष्ट्रात दोन सरकारांच्या काळात फॉक्सकॉन महाराष्ट्रात राहण्यासाठी दोन घटनाक्रम काय होते ते आपण जाणून घेतलं आहे. आता फॉक्सकॉनवरून आणखी काय काय आरोप प्रत्यारोप होतात आणि राजकारणाचे कुठले रंग पाहण्यास मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT