जगात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जिनोम सिक्वेन्सिग हा मुद्दा सातत्याने चर्चेत येता दिसतोय. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट आढळून येत असून, हे व्हेरिएंट जिनोम सिक्वेन्सिगच्या माध्यमातून समोर आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा प्रकार आणि त्यात होणारी उत्क्रांती, या विषाणूमध्ये होणारे म्युटेशन आणि त्यातून निर्माण होणारे विविध व्हेरिएंटबद्दल समजून घेण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारणाचा (जिनोम सिक्वेन्सिग) सखोल अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सरकारने देशातील जिनोम सिक्वेन्सिगवर संशोधन करण्याऱ्या प्रयोगशाळांची राष्ट्रीय पातळीवर एक संस्था स्थापन केली.
INSACOG म्हणजे काय?
INSACOG अर्थात ‘द इंडिअन सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टियम’. केंद्र सरकारने 30 डिसेंबर 2020 ला स्थापन केलेली जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांच्या राष्ट्रीय पातळीवरील बहु-संस्थांची केंद्रीय संस्था आहे. सुरुवातीला या संघात 10 प्रयोगशाळांचा समावेश होता. मात्र आता, INSACOG अंतर्गत कार्य करणाऱ्या प्रयोगशाळांची व्याप्ती वाढविण्यात आली असून, सध्या या संघामध्ये 28 प्रयोगशाळांचा समावेश केलेला आहे. या प्रयोगशाळा कोविड 19 (सार्स- को व्ही-2) विषाणूच्या (व्हायरसच्या) जनुकीय उत्परिवर्तनावर (जिनोम म्युटेशन) लक्ष ठेवण्यासाठी संशोधनाचं काम करतात.
INSACOG चे उद्दिष्ट काय आहे?
सार्स- को व्ही-2 विषाणू ज्याला सर्वसामान्य भाषेत कोविड-19 विषाणू म्हटलं जातं. त्याच्या संसर्गाने जागतिक पातळीवर सार्वजनिक आरोग्याला अभूतपूर्व असा धोका निर्माण केला. कोविड विषाणूच्या प्रसाराचा प्रकार आणि त्यात होणारी उत्क्रांती, या विषाणूमध्ये होणारे उत्परिवर्तन (म्युटेशन) आणि त्यातून निर्माण होणारी विविध रूपे (व्हेरिएंट्स) यांना संपूर्णपणे समजून घेण्यासाठी या विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा (जिनोम सिक्वेन्सिग) सखोल अभ्यास आणि जनुकीय माहितीचे विश्लेषण करण्याची गरज असते.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सापडलेल्या विविध रूपांतील कोविड 19 विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा (जिनोम सिक्वेन्सिगचा) अभ्यास करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार तसेच उत्क्रांती कशी होते याबाबतचे ज्ञान वाढविण्यासाठी INSACOG ची स्थापना करण्यात आली. INSACOG मध्ये कार्यरत प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांचे विश्लेषण आणि क्रमनिर्धारण निश्चित करण्यातून या विषाणूच्या जनुकीय लिपीमध्ये झालेले कोणतेही बदल, किंवा विषाणूमधील उत्परिवर्तन नेमके लक्षात येऊ शकते.
देशात सापडणाऱ्या कोरोना विषाणूंच्या नमुन्यांपैकी दखलपात्र रूपं (व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट) आणि चिंताजनक रूपे (व्हेरिएंट ऑफ कन्सर्न) यांची अचूक स्थिती निश्चित करण्याचं काम या संस्थेचं आहे. विविध जनुकीय रूपांची माहिती लवकर मिळण्यासाठी संरक्षणात्मक तपासणी तसेच संसर्गवाढ तपासणी यंत्रणा निर्माण करणे आणि सर्वसामान्य जनतेकडून परिणामकारकतेने आरोग्यविषयक प्रतिसाद मिळण्यासाठी मदत करण्यातही संस्थेची भूमिका असते.
मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरविण्याऱ्या घटनांदरम्यान तसेच ज्या भागात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण आणि या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे, अशा भागातून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये जनुकीय उत्परिवर्तन (नवीन व्हेरिएंट) झालेल्या रूपांची उपस्थिती निश्चित करण्याचं काम जिनोमिक्स कॉन्सॉर्टियम करते.
ADVERTISEMENT