ईडीने आज नागपूरमध्ये केलेल्या कारवाईत वकील सतिश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके यांना जमिनीवर कब्जा केल्या प्रकरणात अटक केली आहे. देवेंद्र फडणवीसांविरुद्ध याचिका, जस्टीस लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सनसनाटी आरोप केल्यामुळे चर्चेत आलेल्या सतिश उके यांच्यावर कारवाई झाल्यामुळे नागपूरसह राज्यभरात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. गुरुवारी सकाळी ईडीच्या पथकाने उके यांच्या घरी छापेमारी करत तपासाला सुरुवात केली. जवळपास सात तास चाललेल्या चौकशीदरम्यान उके बंधू तपासात सहकार्य करत नसल्यामुळे ईडीने त्यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत उकेंविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारीवरुन ईडीने ही कारवाई केल्याचं कळतंय. २०१८ साली नागपूरमध्ये बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवून सतिश उके यांनी अर्धा एकर जमिन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००१ साली उके यांनी या विवादीत जमिनीवर अवैधरित्या कब्जा मिळवला, ज्यानंतर त्यांनी ही जमीन इतरांना विकली. २०१८ जुलै मध्ये उके बंधूंना या प्रकरणात अटकही झाली होती. या जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे ११.५ कोटी असल्याचं बोललं जातंय. याव्यतिरीक्त उके यांच्याविरुद्ध जमिनीवर अवैध कब्जा, फसवणूक आणि विनयभंग असे धक्कादायक गुन्हे दाखल आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दलची माहिती लपवल्याची तक्रार करणारी याचिका सतिश उके यांनी कोर्टात केली होती. याचसोबत काँग्रेस नेते नाना पटोले यांचेही ते वकील आहेत. न्यायाधीश लोया प्रकरणात उके यांनी सनसनाटी आरोप केले होते.
मोठी बातमी ! अॅडव्होकेट सतिश उके यांना ईडीकडून अटक, वकिलांची माहिती
दरम्यान ईडीने उके यांची वैद्यकीय तपासणी करुन ट्रान्झिट रिमांड घेत त्यांना मुंबईकडे नेण्याचं ठरवलं आहे. शुक्रवारी उके यांना मुंबईत विशेष PMLA कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
ADVERTISEMENT