अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला आहे. या बातमीने सगळंच मनोरंजन विश्व हादरलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत काहीही स्टेटमेंट दिलेलं नाही. कारण सिद्धार्थच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम सुरू आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत कोणताही फाऊल प्ले म्हणजेच काहीही चुकीचं आढळलेलं नाही. सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा इजा झाल्याची खूण नाही असं मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हटलं आहे मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी?
सिद्धार्थच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत काहीही चुकीचं आढळलेलं नाही. त्याच्या कुटुंबीयांकडूनही कुठल्याच प्रकारचा संशय व्यक्त झालेला नाही. डॉक्टर्स, पोलीस यांच्या उपस्थितीत पंचनामा सुरू आहे. पोलिसांसमोर सिद्धार्थचा मृतदेह दुसऱ्यांदा तपासण्यात आला आहे. कूपर रूग्णालयातील कॅज्युल्टी विभागात सिद्धार्थचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.
या पोस्टमॉर्टेमची व्हीडिओग्राफी करण्यात येते आहे. पोस्ट मॉर्टेम संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संपेल असा अंदाज आहे. सुरूवातीला सिद्धार्थच्या मृत्यूबाबत पोलिसांना कळवण्यात आलं नव्हतं. मात्र सिद्धार्थला कूपर रूग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आलं. सिद्धार्थची बहीण, मेहुणे, चुलत भाऊ आणि तीन मित्र रूग्णालयात आले होते. त्याला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतले गेल्यानंतर सिद्धार्थचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सोपवला जाईल. त्यानंतरही कुटुंबीयांनी काही आक्षेप घेतले तर पोलीस तपास करतील असंही सांगण्यात आलं आहे.
आणखी काय म्हटलं आहे पोलीस सूत्रांनी?
पहाटे 3-3.30 च्या सुमारास सिद्धार्थ जागा झाला होता. त्यावेळी त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. त्याने त्याच्या आईला छातीत दुखत असल्याचं सांगितलं. आईन त्याला पाणी दिलं त्यानंतर सिद्धार्थ झोपी गेला. मात्र त्यानंतर सिद्धार्थ जागा झालाच नाही. त्याच्या आईने सकाळी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बहिणीनेही त्याला हाक मारली मात्र सिद्धार्थला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात, बॉलिवूडमध्येही चमकला
12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 2004 मध्ये त्याने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2008 मध्ये, तो ‘बाबुल का आंगन छोटे ना’ नावाच्या टीव्ही मालिकेत सर्व प्रथम छोट्या पडद्यावर झळकला होता. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख ही ‘बालिका वधू’ या मालिकेतूनच मिळाली. ज्यामुळे तो घरोघरी पोहचला.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला. तो 2014 मध्ये हंपटी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला होता. तर याच वर्षी (2021) त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ नावाची वेब सीरीज देखील आली होती.
ADVERTISEMENT