केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा ही चांगलीच वादळी ठरली असं दिसून येतं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही यात्रा पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आहे की शिवसेना शिव्या शाप यात्रा आहे असा प्रश्न पडावा अशीही यात्रा ठरली. त्यात सुरूवातीला शांत बसलेली शिवसेना मात्र नारायण राणे यांनी जो ‘कानाखाली मारली असती’ असा जो उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केला, त्यानंतर शिवसेना विरूद्ध नारायण राणे, शिवसेना विरूद्ध भाजप आणि राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा सामना बघायला मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अटक करण्यात आली. ही अटक नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोकणात करण्यात आली.
ADVERTISEMENT
मात्र नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. शिवसेना आणि आणि नारायण राणे यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नातं आहे हे महाराष्ट्राला माहित आहेच. चाळीस वर्षे शिवसेनेत राहिल्यानंतर नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. नारायण राणेंना जेव्हा अटक झाली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं भाषणही व्हायरल झालं. मात्र नारायण राणे हे शिवसेनेला कायमच शिंगावर घेत असतात. शिवसेनाही त्यांना जशाच तसं उत्तर देत असते. त्यामुळे हा सामना रंगतोच. मात्र नारायण राणेंना अटक करून शिवसेनेने दाखवून दिलं की बेताल बोललं तर खैर नाही.
मागच्या महिन्यात जेव्हा सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आला त्यावेळी त्या पूरग्रस्त भागांची पाहणी नारायण राणे करायला गेले होते. त्याचवेळी मुख्यमंत्रीही त्याच भागात होते. केंद्रीय मंत्री आलेले असताना तिथे अधिकारी का नाहीत? असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला त्यावेळी CM उद्धव ठाकरेंचा दौरा आहे असं उत्तर त्यांना देण्यात आलं. ज्यानंतर सीएम बीएम गेला उडत असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं. हा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.
एवढंच नाही तर सुशांत सिंग आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांनीही पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आदित्य ठाकरेंनी हे सगळे आरोप फेटाळले. या प्रकरणात सीबीआयलाही तशी काही लिंक आढळली नाही. मात्र नारायण राणे यांनी याच संदर्भातले आरोप तेव्हा केले होते.
Narayan Rane म्हणजे भोकं पडलेला फुगा, ‘सामना’तून शिवसेनेचा ‘प्रहार’
आता नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर ते जेव्हा राज्यात आणि खासकरून मुंबईत आले तेव्हा त्यांच टार्गेट होतं शिवसेना आणि शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. मंगळवारी त्यांनी स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं होतं त्यात स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव असा प्रश्न विचारला होता. त्याच बाबीचा संदर्भ देत मी तिथे असतो तर कानाखाली चढवली असती असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर मुख्यमंत्री कार्यालय कामाला लागलं. काही अधिकाऱ्यांनी राज्यातल्या विविध शहरांमध्ये नारायण राणेंच्या वादग्रस्त विधानाप्रकऱणी गुन्हे दाखल केले.
Shivsena Vs Narayan Rane: राणेंना शिवसैनिक ‘कोंबडी चोर’ का म्हणतात?; कुणी केलेली सुरुवात?
एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नारायण राणे यांच्या अटकेचा प्लान तयार केला. नारायण राणेंच्या विरोधात विविध ठिकाणी FIR दाखल करण्यात आल्या. त्यापैकी एक दाखल करण्यात आली होती ती महाडच्या पोलीस ठाण्यात. त्यानंतर आणखी एक FIR दाखल करण्यात आली ती ठाण्यात. तिसरी आणि चौथी एफआयआर पुणे आणि नाशिकमध्ये दाखल करण्यात आली. नारायण राणे जे बोलले ते ती शिवसेनेला त्यांच्या अटकेसाठीची संधीच वाटली कारण भाजपही त्यांचा बचाव वक्तव्यावरून करू शकला नाही असं इंडिया टुडेला शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. नारायण राणेंना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. रात्री उशिरा नारायण राणेंना जामीन मंजूर झाला मात्र शिवसेनेला जे साधून नारायण राणेंना जे दाखवून द्यायचं होतं ते त्यांनी दाखवलंच यात काही शंकाच नाही.
ADVERTISEMENT