शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षाला दिशा देण्याचं काम करणार. धोरण सांगणारं भाषण करतील, राज्याच्या राजकारणात काहीजण संभ्रम करत आहेत. हे सरकार जाईल, ते सरकार येईल अशा चर्चा सुरू आहेत. या सगळ्यामुळे जो राजकीय संभ्रम होणार आहे तो दूर करण्याचं काम आज उद्धव ठाकरे करणार आहेत असंही संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?
महाविकास आघाडी सरकारची कुंडली ही पाच वर्षांसाठीच मांडण्यात आली होती. आमचा कोणताही नवा फॉर्म्युला नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्ष आमच्या तिघांपैकी कोणाला डोळा मारत असेल, तर त्याचा काही उपयोग होतोय का? त्यांचं एकतर्फी प्रेम असेल तर त्यांचा एकतर्फी प्रेमभंग होईल. हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की काँग्रेससोबत आम्ही युती केली असली तरी आमचा हिंदुत्ववाद आधीएवढाच प्रखर आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या कुबड्यांवर शिवसेनेचं राजकारण सुरू राहणार का?
राष्ट्रीय पक्षांनाच त्यांची सरकारं बनवण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या. हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या कुबड्यांची शिवसेनेला नाही तर राष्ट्रीय पक्षच शिवसेनेवर अवलंबून आहेत हे स्पष्ट आहे.
ममता बॅनर्जी यांनी जी निवडणूक लढवली तिच्या केंद्रस्थानी आपले विरुद्ध बाहेरचे हाच मुद्दा होता. शिवसेनेनं 55 वर्षांपूर्वीच ही भूमिका मांडलीय.
मराठी माणसाच्या मुद्यापासून शिवसेना कधीही फारकत घेणार नाही. मराठी माणूस हा आमच्या केंद्रस्थानी कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल यात आमच्या मनात शंका नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Shivsena-BJP: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची-संजय राऊत
देशाच्या राजकारणात शिवसेना हा खूप मोठा चमत्कार आहे. इथल्या मराठी लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. सगळे म्हणत होते की मुंबई महानगर पालिका हीच शिवसेनाची सीमारेषा राहील. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा लोकं म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरूप नष्ट झाले. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, त्यामुळे शिवसेनेची पाळंमुळं आजही खोल रुजली आहेत. आज घडीलाही दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही शिवसेनेची भूमिका आहे. उद्याही अशीच भूमिका असणार आहे असंही राऊत यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT