मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांची तक्रार केली होती त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांना बोलवून शरद पवार यांनी झापलं असल्याच्या बातमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की असल्या बातमीत काहीही तथ्य नाही. शरद पवारांनी आम्हाला भेटायला बोलावलं होतं त्यामुळे त्यांना भेटलो असंही अजितदादांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटल्यावर काय रंगली होती चर्चा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची परवा भेट घेतली. या दरम्यान दोघांची साधारण 30 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत तक्रार केली आणि सरकार टिकवण्याची जबाबदारी फक्त शिवसेनेची नाही असं शरद पवार यांना सांगितलं अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने समोर आली होती. या बातमीला दुजोरा मिळण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे या भेटीनंतर लगेच गुरूवारी सकाळी अजित पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांनी भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीदरम्यान काय घडलं ते देखील गुलदस्त्यातच आहे. मात्र या भेटी दरम्यान शरद पवारांनी या तिघांनाही समज दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. नेमकं या ठिकाणी काय घडलं? उद्धव ठाकरेंनी अशी काही तक्रार शरद पवारांकडे केली होती का? हा प्रश्न अजित पवारांना पुण्यात मुंबई तकने विचारला.
उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर घणाघाती टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय उत्तर दिलं?
मला शरद पवार यांनी सकाळी साडेआठला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी वेळ दिली होती. जयंत पाटील यांना सकाळी ९ वाजताची वेळ दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यांनी बोलावल्यानंतर आम्ही जाणारच. त्यांनी आम्हाला कुठेही असं सांगितलं नाही की तुमच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनीही काहीही तक्रार केलेली नाही. कुणाची काहीही तक्रार नाही. महाविकास आघाडीमध्ये सगळं काही चांगलं आहे ऑल इज वेल आहे. आपल्या कानावर जर अशी काही बातमी आली असेल तर ती साफ चुकीची आहे. बिनबुडाची ही बातमी आहे अशी काही बातमी असेल तर त्या बातमीत नखाएवढंही तथ्य नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून, चर्चा करून महाविकास आघाडीचं सरकार कारभार करतं आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT