सरकारी बंगला ते लाखांत पेन्शन : निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना कोणत्या सुविधा मिळणार?

मुंबई तक

• 03:32 PM • 21 Jul 2022

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वी 23 जुलै रोजी अशोका हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदावर असताना अनेक सुविधा मिळत आहेत. या सुविधांमध्ये दरमहा पाच लाख रुपये पगार तसेच मोफत वैद्यकीय सेवा, निवास आणि वाहतूक सुविधा. निवृत्तीनंतरही यातील अनेक […]

Mumbaitak
follow google news

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वी 23 जुलै रोजी अशोका हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदावर असताना अनेक सुविधा मिळत आहेत. या सुविधांमध्ये दरमहा पाच लाख रुपये पगार तसेच मोफत वैद्यकीय सेवा, निवास आणि वाहतूक सुविधा. निवृत्तीनंतरही यातील अनेक सुविधा माजी राष्ट्रपतींसाठी सुरूच असतात.

हे वाचलं का?

रामविलास पासवान यांचा बंगला कोविंद यांना मिळणार

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवृत्तीची तयारी गेल्या महिन्यापासूनच सुरू झाली होती. पदावरून पायउतार झाल्यानंतर रामनाथ कोविंद 12 जनपथ येथे राहणार आहेत. हा बंगला दिल्लीतील सर्वात मोठ्या बंगल्यांपैकी एक आहे. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान मरेपर्यंत या बंगल्यात राहत होते.

Draupadi Murmu यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय, २५ जुलैला शपथविधी

सोनिया गांधीच्या बंगल्याशेजारी राहणार माजी राष्ट्रपती

रिपोर्टनुसार, रामनाथ कोविंद 25 जुलैलाच या बंगल्यात शिफ्ट होतील असं सांगण्यात येत आहे. त्यांच्या शेजारी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींचा बंगला आहे, त्या 10 जनपथ येथे राहतात. या बंगल्याशिवाय रामनाथ कोविंद यांना इतर सुविधाही मिळणार आहेत. या सर्व सुविधा त्यांना प्रेसिडेंशियल अचिव्हमेंट अँड पेन्शन अॅक्ट, 1951 अंतर्गत उपलब्ध असतील.

कर्मचारी आणि कार्यालयासाठी पैशांची सुविधा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे. त्याचबरोबर सचिव स्तरावरील कर्मचारी आणि कार्यालयांसाठीही पैसे उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. रामनाथ कोविंद यांना आता आयुष्यभर भाडे द्यावे लागणार नाही. किमान आठ खोल्या असलेल्या घराला ही सुविधा लागू असणार आहे.

निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना दोन लँडलाईन, एक मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन दिले जाणार आहे. यासोबतच मोफत वीज आणि पाण्याचीही व्यवस्था असणार आहे. एक कार आणि ड्रायव्हर देखील दिला जाईल. निवृत्त झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना दोन सचिव आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षाही मिळणार आहे.

माजी राष्ट्रपतींवर आयुष्यभर मोफत उपचाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच प्रवासासाठी मोफत प्रथम श्रेणीचे रेल्वे तिकीट आणि विमान तिकीटाचीही सुविधा आहे. राष्ट्रपतींसोबत आणखी एक व्यक्ती मोफत प्रवास करू शकते.

प्रत्येक पाच प्रवाशांमागे एक सहाय्यक सुविधाही आहे. याशिवाय माजी राष्ट्रपतींना देशभर फिरण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त कारही मिळणार आहे. या सर्वांसह, माजी राष्ट्रपतींच्या पत्नी/पतीला सचिव स्तरावरील मदतीसाठी दरमहा 30 हजार रुपये मिळतील.

    follow whatsapp