हर्षदा परब: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांना बेड मिळविण्यासाठीदेखील वणवण करावी लागतेय. वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि त्यानंतर राज्यात असलेल्या ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे राज्यात मृत्यू होत असल्याचंही समोर येत आहे. परिणामी राज्यात मृत्यूची संख्या वाढताना दिसतेय. 1 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान मृत्यूचा आकडा वाढताना दिसतोय. मात्र, मृत्यूदरांत फार वाढ झालेली नाही असं राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.सुरुवातीला आपण आकडेवारी बघूयात
ADVERTISEMENT
दिनांक – 1 एप्रिल
नवीन रुग्ण – 43,183
मृत्यू – 249
मृत्यू दर – 1.92 टक्के
1 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान नवीन रुग्णांची संख्या 25 हजारांनी वाढलीय. 28 एप्रिलला राज्यात 63,309 नवीन रुग्ण आढळले. तर, 1 एप्रिलला 249 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. पण, 28 एप्रिलला राज्यात 985 मृत्यू नोंदवले गेले आहेत. 15 एप्रिलला राज्यात 349 मृत्यू नोंदवले होते. त्यावेळी राज्याचा मृत्यूदर हा 1.63 टक्के होता.
दिनांक – 15 एप्रिल
मृत्यू – 349
नवीन रुग्ण – 61,695
मृत्यू – 1.63 टक्के
आता मागच्या आठवड्यातील आकडेवारी बघूयात
दिनांक मृत्यू नवीन रुग्ण मृत्यू दर
28 एप्रिल – 985 – 63,309 – 1.50 टक्के
27 एप्रिल – 895 – 66,358 – 1.5 टक्के
26 एप्रिल – 524 – 48,700 – 1.5 टक्के
25 एप्रिल – 832 – 66,191 – 1.51 टक्के
24 एप्रिल – 676 – 67,160 – 1.51 टक्के
23 एप्रिल – 773 – 66,836 – 1.52 टक्के
22 एप्रिल – 568 – 67,013 – 1.53 टक्के
1 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात राज्यात होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली तर मृत्यूदरात वाढ झाली नसल्याचं आकडेवारीवरुन समोर येतंय. राज्यात वाढणारे मृत्यू हा केवळ एक संख्या आहे की कोरोना गंभीर रुप धारण करतोय याबाबत मुंबई तकने राज्याचे आरोग्याच्या साथरोग नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. पदीप आवटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी राज्यातल्या वाढत्या मृत्यूचं हे कारण ही वाढती रुग्णसंख्या असल्याचं सांगितलं आहे.
“महिन्याभराचा मृत्यूदर पाहिला तर सातत्याने 1 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं दिसतं. पहिल्या लाटेच्या तुलनेत हा निश्चित कमी आहे. पहिल्या लाटेत 3.5 ते 4 टक्के पर्यंत गेलं. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या .5 टक्के असं मृत्यूचं प्रमाण म्हटलं तरी ते निव्वळ संख्येत हे प्रमाण जास्त दिसतं. त्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण जास्त दिसतंय. असं असताना रुग्णांमध्ये न्युमोनिया होण्याचं, व्हेंटिलेटर लागण्याचं प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा तुलनेने कमी आहे.” अशी माहिती डॉ. आवटे यांनी दिली. यावेळी त्यांनी अचानाक वाढलेल्या मृत्यूच्या आकडेवारीबाबत देखील मुंबई तकला सविस्तर सांगितलं. “दररोज मृत्यूची संख्या नोंदवतो आहोत. मात्र माहिती अपडेट होण्यात वेळ लागतो. अनेकदा आधीचे मृत्यू नोंदवले जातात त्याने ही आकडेवारी वाढलेली दिसते. 28 एप्रिलला जी मृत्यूची आकडेवारी 900 पर्यंत वाढलेलली दिसली त्यात मागच्या आठवड्यातील मृत्यू नोंदवलेले आहेत. ज्याने मृत्यूमध्ये वाढ झाल्याचं दिसतं. सध्या दिवसाला 350 कोरोना मृत्यू होत असल्याची माहिती डॉ. आवटे देतात.
डॉ. आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 28 एप्रिलला नोंदविलेल्या मृत्यूच्या आकडेवारीबाबत आम्ही फॅक्टचेक केलं असता. 28 एप्रिलला नोंदविलेल्या मृत्यूपैकी 392 मृत्यू हे मागच्या 48 तासातले आहेत. तर 251 मृत्यू हे मागच्या आठवड्यातले आहेत. 28 एप्रिलला नोंदविलेल्या या मृत्यूंमध्ये 23 एप्रिलपासूनचे मृत्यू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे. ज्यानुसार 28 एप्रिलला 350 कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई तकशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार राज्यात होणारे मृत्यू हे गंभीर रुग्णांचे आहेत. राज्यात आढळणाऱ्या एकूण रुग्णांच्या सुमारे 1 ते 2 टक्के रुग्ण हे गंभीर रुग्ण असतात. तर, 6 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग जास्त आहे आणि रुग्णसंख्या देखील भरपूर आहे. परिणामी मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते.
ADVERTISEMENT