सध्या महाराष्ट्राचं राजकारण राज्यसभेच्या सहाव्या जागेभोवती फिरत आहे. संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेची ऑफर धुडकावून अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलीये. दुसरीकडे शिवसेनेनं कोल्हापूर जिल्हाध्यक्षाच्या गळ्यात राज्यसभेची माळ घालण्याची तयारी पूर्ण केली आहे. अशात काँग्रेस महाराष्ट्रातून कुणाला राज्यसभेत पाठवणार याबद्दलची उत्सुकता वाढलीआहे.
ADVERTISEMENT
अशात महाविकास आघाडी सरकारचे इतर घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वाट्यातील निवडून येणाऱ्या उमेवरांची चर्चा जरा दुर्लक्षितच झाली आहे. ज्यामध्ये संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल रिपीट होण्याचे स्पष्ट चिन्हं आहेत.
काँग्रेसच्या कोट्यातून पी. चिदंबरम यांना पुन्हा महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाईल का? याचीही चर्चा करणं गरजेचं आहे. कारण यावेळी चिदंबरम यांना तामिळनाडूतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
तर यंदा राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्राच्या कोट्यातील सीटवर महाराष्ट्राचा चेहरा देणार की पुन्हा पी. चिदंबरम किंवा इतर कुठला बाहेरच्या राज्यातील आयात चेहरा पुढे करणार याबाबत काँग्रेस पक्षात उत्सुकता आहे.
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या या जागेसाठी चार नावांची चर्चा आहे. यामध्ये चिदंबरम यांच्याव्यतिरिक्त गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि संजय निरुपम यांच्या नावांचा समावेश आहे. आता ही नावं का चर्चेत आहेत हे ही पाहूयात…
गुलाम नबी आझाद हे माजी खासदार आणि राज्यसभेत विरोधी पक्ष नेते होते. दरम्यानच्या काळात त्यांची भाजपसोबतची वाढती जवळीक हा चर्चेचा विषय होता.
काँग्रेस पक्ष नेतृत्व आणि कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या G-23 चे ते नेते होते. म्हणून त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याला स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध आहे. त्याचबरोबर आझाद यांचं महाराष्ट्राशी जुनं नातं आहे.
1980 आणि 84 साली आझाद महाराष्ट्राच्या वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 1990 ते 96 या काळात महाराष्ट्रातूनच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा चिदंबरम यांच्या ऐवजी गुलाम नबी आझाद यांना महाराष्ट्रातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.
काँग्रेसला मोठा झटका! कपिल सिब्बल सपाच्या पाठिंब्यावर लढवणार राज्यसभेची निवडणूक
मुकुल वासनिक हे गांधी परिवाराचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सध्या ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आहेत. ते महाराष्ट्रातून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
2014 साली रामटेक लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यापासून त्यांनी संघटनेची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र आता एक वरिष्ठ आणि दलित चेहरा म्हणून वासनिक यांना संसदेत प्रतिनिधित्व देण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार असल्याचं सांगितलं जातंय.
संजय निरुपम यांचंही नाव चर्चेत आहे. महाराष्ट्रातला काँग्रेसचा उत्तर भारतीय आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी दोन वेळा राज्यसभेतून आणि एकदा उत्तर मुंबई लोकसभेतून निवडून गेले आहेत.
पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडण्याचे काम सातत्याने केलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अडगळीत असल्याने नाराज आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संजय निरुपम यांचे नाव चर्चेत आहे.
खरंतर महाराष्ट्राच्या कोट्यातील सीट महाराष्ट्रातच राहावी अशी अपेक्षा राज्यातील नेत्यांची आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार प्रदेशाध्यक्ष आणि सी.एल.पी यांच्या सहमतीने संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय इलेक्शन कमिटीला पाठवले जाते.
पक्षश्रेष्ठीच अंतिम नावावर शिक्कामोर्तब करतं. तसेच मागच्या वेळेस महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. त्यामुळे यंदा राज्यसभेवर काँग्रेस मधून महाराष्ट्रातल्या चेहऱ्याला संधी मिळणार की पुन्हा एकदा उमेदवार आयात केला जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT