२० ऑक्टोबरला ‘एमसीए’ची अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai cricket association) निवडणूक होतेय. ही निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडी बातम्यांचा विषय ठरल्यात.
ADVERTISEMENT
याच कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढणारे सत्ताधारी ‘एमसीए’च्या निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र आलेत. त्यामुळे राजकारण्यांना ही क्रिकेटच्या मैदानातील ‘एमसीए’च्या निवडणुकीत इतका रस कशासाठी? या निवडणुकीत जिंकून त्यांना काय फायदा होणार आहे? हे समजून घेण्यासाठी ‘एमसीए’ अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकारण समजून घेणं आवश्यक ठरतं.
बीसीसीआय (The Board of Control for Cricket in India) हे क्रिकेटमध्ये जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखलं जाते. त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए (Mumbai cricket association) ही बीसीसीआयची संलग्न राज्य संघटना आहे. ही संघटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत असल्याने एमसीए पैसा आणि ग्लॅमर याबाबतीत बीसीसीआय (The Board of Control for Cricket in India) इतकीच श्रीमंत संघटना आहे.
MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनचं वर्षाला उत्पन्न किती आहे?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल क्रिकेट सामने आणि देशातंर्गत क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून ‘एमसीए’ची (Mumbai cricket association) बक्कळ कमाई होते. त्यामुळेच सोन्याचं अंड देणाऱ्या या कोंबडीवर राज्य करण्यासाठी राजकारणी जिवाचं रान करत असतात.
बीसीसीआय आयपीएलमधून काही हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळविते. त्यातील निम्मा वाटा हा संघ मालकांना, तर काही वाटा हा सदस्य असलेल्या राज्य संघटनांना दिला जातो. संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत बीसीसीआयकडून मुंबई संघटनेला दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये हे आयपीएलच्या नफ्यातून मिळालेत.
त्याशिवाय प्रत्येक मॅच संयोजनापोटी, मॅचच्या दरम्यान स्टेडियममध्ये लावल्या जाणाऱ्या जाहिरातींतून तसेच तिकिट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाचा वाटाही संबंधित संघटनांना दिला जातो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत मुंबई क्रिकेट असोसिएशन संघटनेला शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी बीसीसीआयकडून मिळाला आहे. आणि आगामी वर्षात ही रक्कम ५०० कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
MCA Election 2022 : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र
यामुळेच निवडणुकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकारणी ‘एमसीए’च्या निवडणुकीत एकत्र आलेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पँनेल झालं आहे. पवार-शेलार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांच्या नेत्यांचा समावेश दिसून येतो. यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे जिंतेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विहंग सरनाईक यांचा समावेश आहे.
शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार रोज क्लबच्या मेंबरसाठी स्नेहभोजन ठेवत आहेत. कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी कुणालाच आपल्या हातून गमावयची नाहीये. त्यामुळे ‘एमसीए’वर आपला ताबा राहावा यासाठी सर्व राजकारणी मंडळींनी कंबर कसली आहे.
ADVERTISEMENT