राजकीय जाणकार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. ही भेट चांगलीच चर्चेत आली आहे. याचं कारण तीन तासांहून अधिक काळ या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली प्रशांत किशोर आणि शरद पवार हे दोघे मिळून नेमकी काय रणनीती ठरवतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे या सांगत आहेत की ही भेट राजकीय नाही. मात्र आपला इतका वेळ शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांना दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे प्रशांत किशोर चांगलेच चर्चेत आले आहेत. अशात शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट सुरू असल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन १० तारखेला पार पडला. यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंड भरून कौतुक केलं. एवढंच नाही तर पुढच्या निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचंही वक्तव्य केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. शरद पवार हे नवं धोरण ठरवत आहेत का? 2024 च्या दृष्टीने ही भेट होती का? विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शरद पवारांना केंद्र स्थानी आणून त्यांच्या नेतृत्वात विरोधकांची मोट बांधून लढवायची आहे का? या आणि अशा अनेक शक्यता या भेटीत चर्चिल्या गेल्या असाव्यात असे अंदाज लावले जात आहेत.
विधानसभा निवडणूक : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काय दिला सल्ला?
काय असू शकतात कारणं?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्य केलं होतं ज्यामध्ये ते असं म्हणाले होते की यूपीए 2 असलं पाहिजे आणि त्याचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं आहे. काँग्रेसला वगळून सगळे विरोधी पक्ष एकत्र येणार का? अशा चर्चा यामुळे रंगल्या होत्या. याबाबत प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची चर्चा झाली असू शकते अशी एक शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातले सर्वात प्रबळ नेते आहेत असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी केलं. या वक्तव्याचे विविध अर्थ काढले गेले. 2024 ला लोकसभा निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्यासाठी काय करावं लागेल? या अनुषंगाने चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट ही अराजकीय आहे असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी तीन तासांहून जास्त काळ चर्चा केली आहे त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल असं म्हणता येणार नाही. बंद दारांच्या आड झालेली ही भेट चर्चेत आहे त्याचा परिणाम कदाचित पाच-सहा महिन्यांनी समोर येऊ शकतो अशीही एक शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशांत किशोर यांनी आता रणनीतीकारण म्हणून काम करणं सोडून दिलं आहे. त्यांना पुढे काय करायचं हा प्रश्न पडलेला असू शकतो किंवा त्यांची काही दिशा ठरलेली असू शकते त्या अनुषंगाने त्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली असावी अशीही एक शक्यता आहे.
अशा अनेक शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट ही कितीही अराजकीय म्हटली गेली असली तरीही त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचा अन्वयार्थ आत्ता गुलदस्त्यात आहे तरीही येत्या काळात तो स्पष्ट होईल यात शंका नाही.
ADVERTISEMENT