उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडत नाहीत याचं गौडबंगाल आम्हाला अडीच वर्षात उलगडलं नाही असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी साताऱ्यात म्हटलं आहे. एवढंच नाही तर आम्हा सगळ्यांना त्यांना बंडखोर म्हणता येणार नाही असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. ठाकरे घराण्याबाबत आम्हाला आदर आहे. मात्र संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या तोंडी असलेली भाषा योग्य नाही असंही ते म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
शंभूराज देसाई काय म्हणाले आहेत?
४० आमदार जेव्हा उठावाची भूमिका घेतात, तेव्हा त्याला बंडखोरी म्हणता येणार नाही. आम्हाला आदित्य ठाकरेंबाबतही आदर आहे तसंच उद्धव ठाकरेंबाबतही आदर आहे. मात्र आज आम्हाला गद्दार म्हटलं जातं, बंडखोर म्हटलं जातं. संजय राऊत जी भाषा वापरतात ती भाषा आदित्य ठाकरे यांच्या तोंडी शोभत नाही. हेदेखील शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे
आम्ही जी भूमिका घेतली आहे त्यांचं कौतुक लोकांना आहे. महाविकास आघाडीसोबत जाऊन काहीही साध्य झालं नाही हे आम्ही सातत्याने सांगत होतो. मात्र मान्य केलं गेलं नाही. लोक आम्हाला हे सांगत आहेत की अडीच वर्षांपूर्वीच हे पाऊल उचललं असतं तर बरं झालं असतं. आता आदित्य ठाकरे जे बोलत आहेत ते उरलेसुरले आमदार आणि इतर लोक टिकून रहावेत यासाठी बोलत आहेत. अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांना जे काही समाधान मिळवायचं आहे ते मिळवावं आम्हाला त्यात स्वारस्य नाही, असंही शंभूराज देसाई म्हटलेत.
उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले आहेत शंभूराज देसाई?
उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेसची साथ का सोडत नाहीत? हे कोडं आम्हाला उलगडलेलं नाही. आम्ही सांगून थकलो मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही. म्हणून ही उठाव करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. काहीही झालं तरीही शिवसेना काँग्रेससोबत जाणार नाही तसं करायची वेळ आली तर शिवसेनेचं कामकाज बंद करून टाकेन हे बाळासाहेब ठाकरे यांचेच शब्द आहेत. आम्ही सगळे त्याच विचारांवर चालत आहोत.
२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यानंतर राजकीय भूकंप आला. महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आता एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. असं घडू नये, पक्ष आणखी फुटू नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेत ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जात आहेत. मात्र रोज एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. शिवसेनेची प्रतिनिधी सभाही आता एकनाथ शिंदे ताब्यात घेऊन शिवसेनेला पडलेलं खिंडार आणखी वाढवायच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT