शिवसेनेतलं अभूतपूर्व बंड २१ जूनला झालं. अवघ्या महाराष्ट्रात अजूनही या बंडाची चर्चा थांबलेली नाही. शिवसेना नुसती फुटली नाही तर दुभंगली. शिवसेनेत दोन गट पडले आहेत एक गट आहे तो उद्धव ठाकरेंचा तर दुसरा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतले ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. तर आणखीही काही लोक शिंदे गटात येऊ शकतात अशी चर्चा आहे. सर्वात मोठी चर्चा आहे ती उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांची. याचं कारण आहे ते म्हणजे गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. याच मिलिंद नार्वेकरांबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
नुकतेच बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरणारे थापा हे शिंदे गटात आले. मला एकनाथ शिंदे यांचे विचार पटल्याने मी त्यांच्यासोबत आल्याचंही थापा यांनी म्हटलं. चंपासिंह थापा यांचाच संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले की आमच्यावर आरोप करतात की आम्ही ५० खोके घेतले. बरं मग चंपासिंह थापा यांनी काय घेतलं? ज्या थापा यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण केलं होतं, ज्या थापा यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या चितेला हात लावला होता ते थापाही सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येत आहेत. असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
थापा आले, आता मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येत आहेत : गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने खळबळ
कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
मिलिंद नार्वेकर हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली होती.
मिलींद नार्वेकर सुरतमध्ये एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्यावर काय झालं?
काही वर्षांपूर्वी मिलिंद नार्वेकर शाखाप्रमुखाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळी नार्वेकर यांचा संवाद साधण्याची शैली, हुशारी पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांची आपल्या स्वीय सचिव पदावर नेमणूक केली. यानंतर नार्वेकर अद्यापही उद्धव ठाकरेंचा राईट हँड ही आपली भूमिका नेमाने बजावत आहेत. आता हे मिलिंद नार्वेकर जर शिंदे गटात गेले तर तो सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंसाठी असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांबाबत काय म्हटलं आहे?
मिलिंद नार्वेकर येत आहेत की नाही मला माहित नाही. मी मुख्यमंत्री आहे मला अनेक लोक भेटायला येत नाही. मी लपवून काहीही ठेवत नाही माझं सगळं पारदर्शक आहे. पोटात एक ओठात एक असं माझं काही नसतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मात्र मिलिंद नार्वेकर हे जर शिंदे गटात गेले तर सर्वात मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंना बसणार यात काहीही शंका नाही. आता दसरा मेळाव्यात हा प्रवेश होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
ADVERTISEMENT