राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ? या प्रश्नावर शर्मिला राज ठाकरे यांनी दिलं सूचक उत्तर

मुंबई तक

• 12:11 PM • 21 Aug 2022

राज ठाकरे, राजकारणातील असं नाव, जे प्रत्येक घडामोडीमध्ये चर्चेत असतं. तिकडे शिवसेना फुटली, शिंदेंनी बंड केलं, तरी चर्चा होतेय ती राज ठाकरेंची . बंड करून एकनाथ शिंदे एकटेच ठाकरेंपासून दूर गेले नाहीत, तर त्यांनी 40 आमदारांना आणि काही खासदारांना आपल्याकडे खेचलंय. आता अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नानं जोर […]

Mumbaitak
follow google news

राज ठाकरे, राजकारणातील असं नाव, जे प्रत्येक घडामोडीमध्ये चर्चेत असतं. तिकडे शिवसेना फुटली, शिंदेंनी बंड केलं, तरी चर्चा होतेय ती राज ठाकरेंची . बंड करून एकनाथ शिंदे एकटेच ठाकरेंपासून दूर गेले नाहीत, तर त्यांनी 40 आमदारांना आणि काही खासदारांना आपल्याकडे खेचलंय. आता अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नानं जोर धरलाय. हाच प्रश्न पत्रकारांनी थेट राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारला. या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी दिलेलं उत्तर हे महत्वाचं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

21 ऑगस्टला शर्मिला ठाकरे पुण्यात होत्या. एका दुकानाच्या उद्घाटनावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी पत्रकारांनी विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा होता आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं होतं, ते त्यांचं उत्तर. दोन्ही भाऊ एकत्र येणार का प्रश्नावर शर्मिला म्हणाल्या, ‘साद घातली तर येऊ देत’. असं सूचक वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे.

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केली प्रशंसा

कोरोना काळात वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सगळे मंत्री घरात बसले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे फक्त बाहेर कामं करताना दिसत होते, अशी स्तुती शर्मिला ठाकरे यांनी टोपे यांची केली. लोकांना मदत करण्याचं काम त्यावेळी मनसैनिकांनी केलं. बेड उपलब्ध करून देण्यापासून ते रेमडीसीव्हीर मिळवून देण्यापर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी कामं केली आहे. यात काही मनसैनिकांचा मृत्यू देखील झाला, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. यासह महागाई, चांगले रस्ते, पाणी प्रश्न, रोजगार या मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शर्मिला ठाकरे अॅक्टिव्ह मोडवर

राज ठाकरे यांना शारिरिक व्याधी झाल्यानंतर त्यांचे अनेक दौरे, अनेक बैठकांमध्ये शर्मिला ठाकरे अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या अनेक निर्णयांमध्ये शर्मिला ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असते. पक्षांच्या अनेक कार्यक्रमांमध्येही शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती प्रामुख्याने असते, त्यामुळे राजकारणात नसल्या तरी पक्षाच्या कामात आणि भूमिकांमध्ये शर्मिला ठाकरेंचं महत्त्व एका नेत्यापेक्षा कमी नाही, अशातच त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त केलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे.

शर्मिला राज ठाकरे यांनी हे शिवसेना मनसेच्या युतीचे संकेत दिलेत का, खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रस्ताव आल्यास शिवसेना भावाच्या मागे उभे राहणार का? असा सवाल आता पुन्हा विचारला जाऊ लागला आहे.

    follow whatsapp