शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

सौरभ वक्तानिया

• 01:48 PM • 04 Jul 2021

शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत विचारला. त्यावर त्यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि भाजप हे शत्रू नाहीत. मात्र आमचे मित्र आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबत गेले. त्यामुळे आमच्यात वैचारिक मतभेद झाले. मात्र सध्या तरी युती होणं, कुणासोबत […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत विचारला. त्यावर त्यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि भाजप हे शत्रू नाहीत. मात्र आमचे मित्र आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबत गेले. त्यामुळे आमच्यात वैचारिक मतभेद झाले. मात्र सध्या तरी युती होणं, कुणासोबत जाणं असा कुठलाही विषय नाही. संजय राऊत आणि आशिष शेलार यांची भेट झाली त्याबद्दल होती का? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले कोण कुणाला भेटतं आहे ते मला माहित नाही. मात्र आमची शिवसेना किंवा इतर कुठल्याही पक्षासोबत काहीही चर्चा चाललेली नाही.

हे वाचलं का?

आमचा काही धुऱ्याचा वाद नाही

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची शक्यता नाही असं जरी वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं असलं तरीही त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ‘आमच्यात कधीही शत्रुत्व नव्हतं. आम्ही शत्रू नाही. आमचे वैचारिक मतभेद झाले आहे. आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत गेले. त्यामुळेच मतभेद आहे. पण तो काही धुऱ्याचा वाद नाही. सुधीरभाऊंचा धुरा उद्धवजींच्या धुऱ्याला लागून आहे त्यांनी यांच्या धुऱ्यावर अतिक्रमण केलं आहे असं नाही. त्यामुळे आमचं कुठलंही शत्रुत्व नाही. पण वैचारिक मतभेद तर आहेतच’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे तुमची मुलाखत घेणार आहेत असं त्यांनी बऱ्याच दिवसांपासून सांगितलं आहे. मात्र ती कधी होणार आहे हे अजून समजलेलं नाही त्याबद्दल काय सांगाल? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की कदाचित त्यासाठीच संजय राऊत आणि आशिष शेलार यांची भेट झाली असेल. फडणवीसांनी हे वाक्य उच्चारताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यानंतरही विचारण्यात आलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तरं दिली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाचं कारण पुढे करून हे सरकार लोकशाहीच कुलुपबंद करू पाहतं आहे. मात्र विरोधक म्हणून आम्ही हे होऊ देणार नाही. अधिवेशनात आम्हाला प्रश्न विचारण्याची सोयच ठेवलेली नाही. गेल्या अधिवेशनात दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले त्यामुळे हे सरकार यावेळी अधिवेशनापासूनच पळ काढतं आहे. यांनी जितके दिवस अधिवेशन घेतलं तितका कमी कालावधी याआधी साठ वर्षात झालेला नाही. कोरोनाची परिस्थिती आहे हे आम्हाला अगदीच मान्य आहे. पण फक्त अधिवेशन टाळण्यासाठी त्याचा वापर केला जातो आहे. इतर सगळ्या गोष्टी कोरोना असतानाही व्यवस्थित सुरू आहेत असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यांना जेव्हा ईडी आणि सीबीआयकडून ज्या काही चौकशा सुरू आहेत त्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा फडणवीस म्हणाले की कोणतीही कारवाई केंद्र सरकारने सांगितलेलं आहे म्हणून, दबाव टाकायचा आहे म्हणून किंवा हेतुपुरस्सर होत नाही. अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई असो की जरंडेश्वर सहकारी कारखान्यावर झालेली जप्तीची कारवाई असो या सगळ्या गोष्टी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर होत आहेत. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तपास यंत्रणा हातावर हात ठेवून बसत नाहीत त्यामुळे या कारवाईकडे कुणीही राजकीय चष्म्यातून पाहू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp