देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाटही आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. ३१ मार्चपासून देशभरातले निर्बंधही संपुष्टात येणार आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे दोन नियम मात्र असणार आहेत असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशात महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? हा प्रश्न महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
”मास्कमुक्तीच्या संदर्भात एक गोष्ट आहे ती अशी आहे, आपल्या देशात कोरोना आटोक्यात आलेला आहे. मात्र दुसऱ्या देशांमध्ये कोरोनाची चौथी लाटही आलेली आहे. त्याचे जे काही परिणाम आपण पाहतो आहोत ते पाहता मास्कमुक्त राज्य करणं हे थोडं धाडसाचं ठरेल. अगदीच मास्क घालायचा नाही हे योग्य नाही. गर्दीच्या ठिकाणी जात असू तिथे मास्क वापरणं आवश्यक आहे. जर आपल्याला कोणताही संसर्ग झाला असेल तर त्यापासून आपला आणि इतरांचा बचाव होऊ शकतो. आपण तूर्तास तरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार केलेला नाही. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल तेव्हा मुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील.”
अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना
टास्क फोर्ससोबत आमची चर्चा सुरू आहे. डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रॉन यानंतर आता डेल्टाक्रॉन व्हायरस आला आहे. त्याचेही काही रूग्ण महाराष्ट्रात आहेत. काळजी कशी घेतली पाहिजे? जगात काय चाललं आहे? आपल्या देशात काय चाललं आहे? या सगळ्याचा अभ्यास टास्क फोर्सकडून केला जातो आहे त्यानंतर आपण निर्णय घेत असतो, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना संमती दिली जाणार का? हा प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले की जर शिस्तबद्ध पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करणार असू तर गुढीपाडव्याची मिरवणूक किंवा इतर गोष्टींना संमती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. अशा प्रकारच्या मागण्याही समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री याबाबत विचारविनिमिय करून योग्य तो निर्णय घेतील. त्याच्या निर्णयाची वाट आपण बघू असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य निर्बंधमुक्त होईल अशीही चर्चा होते त्याबद्दल काय सांगाल? असं विचारलं असता राजेश टोपे यांनी सांगितलं की सध्या राज्यात बऱ्यापैकी अनेक गोष्टी, संस्था, आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. मास्कबाबत आपण कोणतीही शिथिलता दिलेली नाही. मात्र इतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. बाजारपेठा फुलल्या आहेत, शहरांमध्ये गर्दीही होते आहे. वाहतूक सेवांमध्येही गर्दी होते आहे. त्यामुळे आपण निर्बंध शिथीलीकरण झालेलं आहेच. भारत सोडून इतर काही प्रमुख देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळते आहे. तरीही आपल्याकडे कठोर असे म्हटले जावेत असे निर्बंध आजच्या घडीला नाहीत. विमानांच्या उड्डाणांवरही निर्बंध लावलेले नाहीत. लसीकरणाशी संबंधित काही गोष्टी आहेत. त्यासाठी हे निर्बंध लावले गेले आहेत. सध्या आपण काही काळ वेट अँड वॉचची गरज आहे. जगाचं आणि त्यानंतर देशाचं चित्र लक्षात घेऊन त्यानंतर सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT