कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण येताना दिसत आहे. या परिस्थितीतून राज्य सरकार सावरण्याचा प्रयत्न करत असला तरीही काही भागांमध्ये महत्वाच्या वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवतो आहे. अशा परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या स्वॅब स्टिक्स घराघरांमध्ये तयार करुन त्याचं पॅकिंग केलं जात असल्याचं एका व्हिडीओतून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
उल्हासनगरच्या ज्ञानेश्वर नगर भागातील काही घरांमध्ये महिला आणि लहान मुलं कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या स्वॅब टेस्टचं पॅकिंग करत असताना एक व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्टिक्सचं पॅकिंग करत असताना या घरांमध्ये स्वच्छता व इतर नियमाचं पालन होताना दिसत नव्हतं. उल्हासनगर महापालिकेला याबद्दल माहिती कळताच त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत पोलिसांच्या मदतीने धाड मारली. यावेळी घराघरांमध्ये जाऊन चौकशी केली असता स्टिक्सचा साठा पोलिसांना आढळला.
१० ते १५ घरांमध्ये या स्टिक्सचं पॅकिंग केलं जात असून एका घरात सुमारे ५ हजार स्टिक्स पॅक केल्या जात होत्या. दरम्यान या नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात स्टिक्सचं पॅकिंग करण्याची ऑर्डर कुठून मिळाली याचा तपास पोलीस अधिकारी घेत आहेत. याबाबत FDA ला लवकरच अहवाल पाठवण्यात येणार असून तपासाअंती दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली.
ADVERTISEMENT