पणजी: केंद्रात जेव्हापासून मोदी सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्दप्रयोग सातत्याने ऐकायला मिळत आहे. भारतातील एकाही राज्यात काँग्रेसचं सरकार अस्तित्वात असू नये असाच याचा नेमका अर्थ आहे. मात्र हा शब्द कसा उदयास आला याबाबत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (10 फेब्रुवारी) गोव्यातील जाहीर सभेत सांगितलं.
ADVERTISEMENT
गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता येथील प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील म्हापुसामध्ये आज पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळीच बोलताना त्यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्द कसा आला ते सांगितलं.
पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले:
‘गोव्यातील पुण्यात्मांच्या आशीर्वादाने ‘तो’ शब्द माझ्या तोंडून सहजपणे निघाला’
‘माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टींना गोव्याच्या धरतीने निर्णायक बनवलं. आज तुम्ही मला ज्या स्वरुपात पाहत आहात ना याची सुरुवात गोव्यातूनच झाली होती. जून 2013 मध्ये इथे भाजपची कार्यसमिती होती. त्यावेळी मी देखील इथेच होतो. तेव्हा भाजपने मला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार समितीचा प्रमुख म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून देखील घोषित केलं होतं.
‘त्यावेळी मनोहर पर्रिकर यांनी माझी गोव्यातच एक सभा आयोजित केली होती. त्या सभेत माझ्या तोंडून अगदी सहजपणे एक शब्द निघाला होता. तो शब्द होता ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे शब्द गोव्याच्या धरतीतून आणि येथील पुण्यात्मांच्या आशीर्वादाने सहजपणे माझ्या तोंडून निघाले होते. त्यानंतर आपण पाहिलं की, आज हा शब्द देशातील कोटी-कोटी नागरिकांचा संकल्प बनला आहे.’
‘भाजपने गोव्यासाठी स्वयंपूर्णतेचा नारा दिला’
‘गोव्याची एक खास संस्कृती आणि ओळख आहे आणि गोवा सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. ज्यांना गोव्याच्या संस्कृतीची पर्वा नाही त्यांनी गोव्याला आपल्या भ्रष्टाचाराचा, लूटतंत्राचा खूप मोठा एटीएम बनवून ठेवलं होतं. पण भाजपने गोव्यासाठी स्वयंपूर्ण गोव्याचा मंत्र दिला.’
‘भाजपने समग्र विकासाबाबत चर्चा केली. कारण की, विकास हा तुकड्यांमध्ये किंवा जाती-धर्म, भाषा आणि विशिष्ट भागातच करता येणार नाही. समजा, जर नॉर्थ गोव्याचा विकास झाला तर साऊथ गोवा देखील पुढे जाईल.’
Goa Conclave: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकिट कारण ‘ते’ लोकांमधून निवडून येतात: CM प्रमोद सावंत
गोव्यात पर्यटनासाठी विकासाची अधिक गरज
‘गोव्यात पर्यटनाचा विचार केला तर आपल्याला अधिक विकासाची गरज आहे. जर इथे नवे रस्ते आणि नव्या सुविधा आल्या नसत्या तर पर्यटकांनी इथे येणं पसंत केलं नसतं. यासाठी भाजप सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी नवं अभियान सुरु केलं आहे.’ असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT