मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात एक डायरी जप्त केली होती. ज्यामधून आता काहीशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या डायरीमध्ये पैशांच्या काही नोंदी या ‘मातोश्री’च्या नावावर आहे. याचवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
‘शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतून असं माहित पडतंय की, करोडो रुपयांचे गिफ्ट त्यांनी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ला दिले आहेत.’ असा दावा सोमय्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
पाहा किरीट सोमय्यांनी नेमके काय आरोप केले?
‘शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतून असं माहित पडतंय की, करोडो रुपयांचे गिफ्ट त्यांनी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ला दिले आहेत. पाच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकर यांची साडे सहा कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.’
‘दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य, तेजस ठाकरे यांची एक जी कंपनी आहे तिच्या सात कोटींच्या मनी लाँड्रिंगचा खुलासा आम्ही केला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे म्हणत असतील की मी देखील तुरुंगात जाण्यास तयार आहे. घोटाळेबाजांना शिक्षा होणारच.’ असा दावा किरीट सोमय्यांनी यावेळी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली होती. याच डायरीतील एक उल्लेख असा आहे की, ज्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यशवंत जाधवांच्या डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळेच आता या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे.
यशवंत जाधव प्रकरण: IT छाप्यात सापडलेल्या ‘डायरी’मध्ये ‘मातोश्री’ला 2 कोटी, जाधव म्हणतात.. मातोश्री म्हणजे त्यांची आई!
यशवंत जाधव म्हणतात, मातोश्री म्हणजे…
दरम्यान, डायरीत ‘मातोश्री’च्या उल्लेखावरून आयकर विभागाने चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ म्हणजे आपली आई असं म्हटलं आहे. 50 लाख रुपये किंमतीचं घड्याळ हे त्यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलं असल्याचं आयकर विभागालं सांगितले. तर दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना 2 कोटी किंमतीच्या भेटवस्तू दिल्याचं सांगितलं आहे.
असं असलं तरी आता या सगळ्या प्रकरणावरुन भाजप अधिक आक्रमक झाली असून आता ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधत आहेत. यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT