जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने महाराष्ट्रात आगमन केलं. यानंतर पुढचे काही दिवस राज्यभरात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतू यानंतर पाऊस पुन्हा दडी मारुन बसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. परंतू हार मानणं हे शेतकऱ्याच्या स्वभावातच नसतं असं म्हणतात. दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने भन्नाट शक्कल लढवली आहे.
ADVERTISEMENT
रोहिणी भोईटी गावचा तरुण शेतकरी विणेश पावरा याने आपल्या एक एकर शेतीत कपाशीची लागवड केली. परंतू गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे त्याच्यासमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं. त्यामुळे कपाशीच्या बी मधून आलेल्या कोंबांना जगवण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली. प्रत्येक रोपाजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरुन त्याला छोटसं छिद्र पाडत ते पाणी कोंबाला मिळेल अशी व्यवस्था विणेशने केली.
सुदैवाने विणेशचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याच्या शेतातील कपाशीचं पिक हे तग धरायला लागलं. थेंब-थेंब पाणी मिळत राहिल्यामुळे काही कोंब चांगलेच मोठे झाले. यानंतर गेल्या दोन दिवसांत धुळ्यात काही ठिकाणी पावसाचं आगमन झालं, ज्यामुळे पिकांना पाणी मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विणेशने प्लास्टिकच्या पिशव्या काढून टाकल्या आहेत. परंतू दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी त्याने लढवलेल्या युक्तीचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT