हर हर महादेव या सिनेमावरून वाद रंगला आहे. या सिनेमात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमी संघटनांनी घेतला आहे. ठाण्यातल्या व्हिव्हिआना मॉल या ठिकाणी या सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला तसंच काही प्रेक्षकांना मारहाणही करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आता या सगळ्या वादावर या सिनेमाची निर्मिती ज्यांनी केली त्या झी स्टुडिओने स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
हर हर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातो आहे? नेमका वाद आहे तरी काय?
काय म्हटलं आहे झी स्टुडिओने?
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता! त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहचणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा/विचारांचा अभ्यास करून, संदर्भ घेऊन आम्ही हर हर महादेव ची निर्मिती केली आहे.
आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या योद्ध्यांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. आमचा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्ण विश्वास आहे.
-झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्स
असं स्पष्टीकरण आता झी स्टुडिओजतर्फे देण्यात आलं आहे. आज दुपारीच सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आम्ही लवकरच या संदर्भातलं म्हणणं मांडणार आहोत हे सांगितलं होतं.
‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी-मनसे भिडले : ठाण्याच्या मॉलमध्ये तुफान राडा
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी याबद्दल भाष्य केले होते. आजवर आपल्याला जो इतिहास शिकवला गेला आहे, तो तेवढाच मर्यादित नाही. विविध बखरी, दस्तऐवज, यांचा जेव्हा अभ्यास केला जातो, वेगवेगळ्या इतिहासकारांशी याबद्दल चर्चा केली जाते तेव्हा या सगळ्या अभ्यासातूनच हे संदर्भ आपल्याला सापडतात. बाजीप्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील या प्रसंगाबद्दल आम्हालाही सेन्सॉर बोर्डने शंका विचारली होती. यावर आम्ही योग्य पुरावेदेखील सादर केले आहेत असंही देशपांडे यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT