‘गड आला पण सिंह गेला’; भरत गोगावलेंच्या गावातील ग्रामपंचायतीचा निकाल काय लागला?

मुंबई तक

18 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

सत्ता संघर्षानंतर आणि शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर महाराष्ट्रातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये चुरस होती ती ठाकरे गटाकडे किती ग्रामपंचायती तर शिंदे गटाकडे किती? जिथे शिंदे गटाकडे अनेक अपेक्षा होत्या तिथेच भंग झाल्याचं चित्र ग्रामपंचायत निकालानंतर पाहायला मिळालं. या सगळ्यात धक्का बसला तो बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंना… रायगडमध्ये १६ ग्रामपंचायतीच्या ११६ […]

follow google news

रायगडमध्ये १६ ग्रामपंचायतीच्या ११६ जागांसाठी निवडणूक पार पडली. सोमवारी, 17 ऑक्टोबर रोजी या या सर्व ग्रामपंचायतींचा निकाल लागला आणि प्रस्थापितांना धक्का बसल्याचं स्पष्ट झालं.

हे वाचलं का?

16 पैकी ५ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी झेंडा फडकवला. बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला 4 ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलं. भाजपला २ ग्रामपंचायती, तर शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली. इथं शेकापला १ तर स्थानिक आघाडीला ३ ग्रामपंचायती मिळाल्या, मात्र चर्चा होतेय ती महाडचे शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावलेंच्या ग्रामपंचायतीची.

काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चैतन्य म्हामूणकर हे सरपंच म्हणून निवडून आले. या ग्रामपंचायतीत गोगावलेंचे 10 सदस्य निवडून आले मात्र सरपंच महाविकास आघाडीचा झाला. तसं पाहिलं गेलं तर निवडून आलेले सरपंच चैतन्य म्हामूणकर हे काँग्रेसचे, पण महाविकास आघाडीच्या एकसुत्री कार्यक्रमामुळे गोगावलेंना हा धक्का बसलाय. ग्रामपंचायत निवडणूक हीच जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत भरत गोगावले कशापद्धतीने रणनीती आखतात, हे पाहवं लागेल.

    follow whatsapp