अकोला मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांच्या मृत्यूच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. गंभीर हल्ल्यामुळे जयचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 30 जुलै रोजी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. यादरम्यान अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली होती. या घटनेनंतर त्याच दिवशी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकर यांचा मृत्यू झाला, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.