Ajit Pawar Baramati : (वसंत पवार, बारामती) केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निवाडा दिला. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर पहिल्याच सभेत अजित पवार शरद पवारांवर बरसले. 'शरद पवारांच्या पोटी जन्मलो असतो, तर पक्ष माझ्याच ताब्यात आला असता', असं विधान अजित पवारांनी केलं.
ADVERTISEMENT
अजित पवारांची शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) बारामती येथे सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला.
शरद पवारांना अजित पवारांचे प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड करण्यात आल्यानंतर शरद पवार गटाकडून टीका करण्यात आली. त्याला अजित पवारांनी जाहीर सभेतून उत्तर दिले. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याची इच्छा शरद पवारांची होती, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
"तुम्ही जर वरिष्ठांनी (शरद पवार) सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं, तर मग पक्ष चांगला. आम्ही सगळे चांगले. आम्ही (अजित पवार) अध्यक्ष झालो... निवड ही बेकार. यांनी पक्ष चोरला. अरे चोरला? निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली. विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली", असे सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर पलटवार केला.
"...तर राष्ट्रवादी माझ्याच ताब्यात आली असती"
याच सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांना सवाल केला. ते म्हणाले, "आम्ही आमची बाजू मांडली. त्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील, ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तो आमच्यासोबत आहे. त्यांच्यामध्ये अशी का बदनामी करता? असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो, तर आम्हाला (अजित पवार) अध्यक्षपद मिळालं असतं. काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. आला असता ना? मग हे का?", असा उलट सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला.
"तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना? हे सगळं राजकारण चाललंय. हे मी तुम्हाला का सांगतोय की, तुम्ही भावनिक होऊ नका. काहीजण म्हणाले, दादा पंधरा वर्षात फोन आला नव्हता. आता आम्हाला फोन येतोय. कसं चाललंय? पाणी कसं आहे? कुठलं पाणी? कसलं पाणी?", असा टोला अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला.
"अरे तुमच्यासाठी आम्ही काय काय केलं आणि तुम्ही आज विसरून जाता, हे बरोबर नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही महायुती केली आहे", असे अजित पवार बारामतीत म्हणाले.
ADVERTISEMENT