Shivs Sena UBT On Ajit Pawar Revolt : “महाराष्ट्रात भाजपने जे केले त्यामुळे संपूर्ण देशात त्यांची छिः थू होत आहे. सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार हे चक्की पिसायला तुरुंगात जातील अशी गर्जना देवेंद्र फडणवीस वारंवार करीत होते, पण त्याच अजित पवारांनी फडणवीस यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सोमवारी हे ‘चक्की पिसिंग’ फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर त्यांच्या गटाचे खातेवाटप करीत बसले, आश्चर्यच आहे!”, असा चिमटा काढत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेने (युबीटी) सामनात “एक (डाऊट) फुल; दोन हाफ!” मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून, यात देवेंद्र फडणवीसांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही टोले लगावले आहेत. “खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर व्हायला हवी होती, पण अजित पवार व त्यांचा गट पोहोचला ‘सागर’वर. हे आश्चर्यच म्हणायला हवे. मुख्यमंत्र्यांची ही अशी अवस्था केविलवाणी आहे व दिवसेंदिवस ती अधिकच दयनीय होत जाईल”, असं ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे.
‘गुलाबो पाटील, दिपू केसरकर’, ठाकरेंचा वार
पुढे असं म्हटलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे गरजणारे मिंधे गटाचे एक मंत्री गुलाबो पाटील हे राजभवनात अजित पवारांच्या चरणांवर लोटांगण घालायचेच काय ते बाकी होते. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सोडली व त्यांच्याच पायाशी लोटांगण घालणाऱ्या या ओशाळवाण्या चेहऱ्यांकडे पाहून जनता हसत होती. राष्ट्रवादी आमच्याबरोबर सत्तेत सहभागी झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे गरजणारे मिंधे गटाचे सर्व प्रवक्ते अचानक गायब झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची तर वाचाच गेली आहे.”
वाचा >> Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला
“मिंध्यांचे एक मंत्री सावंतवाडीचे दिपू केसरकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच सांगितले होते, ‘बंड फसले असते तर शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल चालवले असते. त्यांची तेव्हाची मानसिक अवस्था फारच खराब होती.’ पण अजित पवारांच्या शपथ ग्रहणानंतर मुख्यमंत्र्यांची मानसिक अवस्था सुरत व गुवाहाटीपेक्षा जास्तच बिघडली असेल. म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावरील सर्व शस्त्रे लगेच सरकारजमा केली पाहिजेत”, असा उपरोधिक सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांना दिलाय.
अपमानाचे घोट गिळायचे…
“दिल्लीवाल्यांची लाथ व फडणवीसांचा बुक्का अशा कोंडीत ते सापडले. अजित पवार यांना मांडीवर घ्यायचे की पायाशी बसून रोज अपमानाचे घोट गिळायचे? असा पेचप्रसंग मिंधे गटाला पडलाय खरा, पण श्रीमान फडणवीस यांचीही काही वेगळी अवस्था नाही”, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीसांना डिवचलं आहे.
ठाकरेंनी सामना अग्रलेख आणखी काय म्हटलंय?
– “अजित पवार, हसन मुश्रीफ, भुजबळ, प्रफुल पटेल यांनीच त्यांच्या तंबूत सन्मानाने प्रवेश केल्याने ते आता चक्की पिसायला कोणास पाठवणार आहेत? मुलुंडचे पोपटलाल, अंजलीबाई दमानिया यांनी तरी काय करायचे? भुजबळांविरुद्ध काय कमी मोहीम उघडली होती? सिंचन घोटाळ्याचेच गाडीभर पुरावे घेऊन फडणवीस बैलगाडीवर स्वार झाले होते.”
वाचा >> शरद पवारांचे निर्णय प्रफुल पटेल बदलू शकतात का? आता पुढे काय होणार?
– “तुरुंगात नवाब मलिक यांच्या बाजूची कोठडी त्यांनी या सगळ्यांसाठी राखूनच ठेवली होती. आता फडणवीस काय करणार? ‘सागर’ बंगल्यावर याच मंडळींसोबत मांडीला मांडी लावून खातेवाटप करण्याचा बाका प्रसंग मोदी-शहांनी त्यांच्यावर आणला. फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, नंतर ते शिंद्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राची ही अवस्था म्हणून ‘एक फुल दोन हाफ’ अशीच झाली आहे. पण जो फुल आहे तोसुद्धा ‘डाऊटफुल’ असल्याने चिंताग्रस्त चेहऱ्याने वावरतो आहे.”
– “महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. विचारांची लढाई विचाराने लढण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. मोदी-शाह-फडणवीसांच्या व्यापारी राजकारणाने या परंपरेस चूड लावली आहे. आणखी एक आश्चर्य असे की, श्री. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत व अजित पवार, प्रफुल पटेल वगैरे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चिन्हासह आपलाच असल्याचे जाहीर करून टाकले.”
वाचा >> भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी
– “शिवसेना फुटीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की, विधिमंडळातील फुटलेला गट म्हणजे पक्ष नव्हे. हे ‘फुटके’ पक्षावर दावा सांगू शकत नाही. हे सत्य असताना ‘पक्ष व चिन्ह’ आमचेच असे सांगणे हे फाजील आत्मविश्वासाचे लक्षण आहे. पण दिल्लीतील महाशक्तीने डोक्यात हवा भरली की हे फाजील आत्मविश्वासाचे फुगे फुगतात. शिवसेना जशी जागच्या जागी राहिली तसेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिसत आहे.”
ADVERTISEMENT