Ajit Pawar met Amit Shah : भाजपने सर्वांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाला सोबत घेत मंत्रिमंडळातही सहभागी करून घेतले. 2 जुलैला त्यांचा शपथविधी झाला. पण, 12 दिवसांपासून त्यांना खात्याचं वाटप झालेले नाही. त्यामुळे अजित पवारांनी थेट दिल्ली गाठत अमित शाहांशी चर्चा केली. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी खातेवाटपाबद्दल स्पष्टता दिली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण यात राष्ट्रवादीतून आलेल्या एका गटातील नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. पण, अजूनही त्यांना खाती वाटप करण्यात आलेली नाहीत. अजित पवार गटाकडून काही महत्त्वाची खाती मागण्यात आली आहे आणि त्यामुळेच तिढा निर्माण झालेला आहे.
शिंदे, फडणवीसांसोबत बैठका
आधी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत चर्चा केली. त्यात तोडगा न निघाल्याने परत दुसऱ्या दिवशी प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या बैठकीतून मार्ग न निघाल्याने अजित पवार यांनी प्रफुल पटेल यांना सोबत घेत दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
वाचा >> Shiv Sena vs NCP: सुनील तटकरेंचं मोठं विधान, गोगावलेंसाठी ‘गुड न्यूज’; पण..
अमित शाहांसोबत बैठक
अजित पवार, प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. अजित पवार यांच्या गटाने अर्थ व नियोजन, महसूल, जलसंपदा आणि सहकार या चार महत्त्वाच्या खात्यांची मागणी केलेली आहे. याच संदर्भात शाहांसोबत चर्चा झाल्याचे समजते. यातील अर्थ खाते हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे, तर महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. दुसरीकडे अर्थ व नियोजन खाते अजित पवारांना देण्यास शिंदेंच्या आमदारांचा विरोध आहे आणि त्यामुळेच हा पेच फसला आहे.
वाचा >> Kalyan Crime: दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावलं अन गेला जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?
खातेवाटप कधी होणार, प्रफुल पटेल काय म्हणाले?
“आम्ही इथे सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. काल मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) मी आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. त्यातील दोन पक्ष आधीपासूनच सरकारमध्ये आहेत. त्यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला आहे. आम्हाला काही खाती मिळतील, त्यामुळे त्यांना वेगळी खाती मिळतील. हे काम सुरूच राहणार आहे. यामध्ये खूप समस्या आहेत, असं कुणाला वाटत असेल, तर असं नाहीये. एक दोन दिवसात महाराष्ट्रात हे स्पष्ट होऊन जाईल”, असं प्रफुल पटेल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर म्हणाले.
ADVERTISEMENT