सुप्रिया सुळेंनी केलं आंदोलन, पण अजित पवार म्हणाले, ‘गौण विषय’

ऋत्विक भालेकर

• 07:45 AM • 15 Jun 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला वादाची किनार लागली, ती अजित पवार यांना भाषण करू न दिल्याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. इतकंच काय तर खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनही केलं. या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पडदा टाकण्याचा प्रयत्न […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला वादाची किनार लागली, ती अजित पवार यांना भाषण करू न दिल्याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. इतकंच काय तर खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनही केलं. या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आणखी दोघांची भाषणं झाली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही उपस्थित होते. पण त्यांचं भाषण न झाल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं.

कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे भाषण करू देण्याची परवानगी मागितली होती, मात्र ती दिली गेली नाही, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर टीका केली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्य आंदोलनातही त्या सहभागी झाल्या.

सुप्रिया सुळे यांच्याबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विट करत मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य केलं.

नवा वाद! “अजित पवारांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी दिली नाही”

‘पंतप्रधानांच्या मागील पुणे दौऱ्यातील पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्रमात काही व्यक्तींना खडे बोल सुनावल्यानं भाजपनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धास्ती घेतलेली दिसत आहे. म्हणूनच अजित पवार यांना षडयंत्र करून आज देहू येथील कार्यक्रमात बोलून दिलेलं नाही. राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचा अपमान हा पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे,’ असं पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी यावरून आंदोलन केलं. मात्र, याच मुद्द्यावर आता अजित पवारांनी भूमिका मांडतांना महत्त्वाचा विषय नसल्याचं म्हटलंय. “मला हा विषय वाढवायचा नाही. या विषयाला महत्त्व देऊ नका,” असं एका ओळीतच अजित पवारांनी या वादाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली.

‘मोदींनी विचारलं तुम्ही बोलणार का?, अजितदादा म्हणाले…’, स्टेजवर काय घडलं ते तुषार भोसलेंनी सांगितलं!

अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काय भूमिका मांडतात हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे.

    follow whatsapp