Lok Sabha Election 2024 Latest News : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातून भाजपच्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ अभियानाची सुरुवात केली होती. 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने आता मायक्रो मॅनेजमेंट रणनीतीवर काम सुरू केले आहे.
ADVERTISEMENT
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने सूक्ष्म व्यवस्थापनाचा मेगा प्लॅन तयार केला आहे. पक्षाचे काम सोप्पं करण्यासाठी भाजपने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तीन विभागांमध्ये विभागणी केली आहे. भाजप अध्यक्ष प्रत्येक क्षेत्रातील प्रमुख नेते आणि संघटना मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
भाजपच्या या मेगा प्लॅनची ब्लू प्रिंट गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांच्या बैठकीच्या तीन फेऱ्यांमध्ये तयार करण्यात आली आहे. बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मॅरेथॉन सभा झाली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण रणनीतीवर चर्चा करण्यात आली. भाजपने संघटनेत बदल करण्यासोबतच निवडणुकीबाबत नव्या रणनीतीची चर्चाही जोर धरू लागली आहे.
हेही वाचा >> शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?
पुढची निवडणूक मागास, दलित, वंचित आणि शोषित वर्गाच्या प्रश्नावर लढवली जाईल, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या भागात जाऊन संबंधित घटकांपर्यंत पोहोचून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी. जो पात्र आहे आणि त्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्याला संबंधित योजनेचा लाभ द्या, असंही मोदींनी सांगितलं आहे.
जेपी नड्डा 6, 7 आणि 8 जुलै रोजी घेणार बैठका
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा 6 जुलैला पूर्वेकडील, तर 7 जुलैला ईशान्येकडील आणि 8 जुलैला दक्षिणेकडील नेत्यांची बैठक घेणार आहेत. पूर्वेकडील नेत्यांची बैठक गुवाहाटी, उत्तरेकडील नेत्यांची बैठक दिल्ली आणि दक्षिणेकडच्या नेत्यांची बैठक हैदराबादमध्ये होणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्षांसह प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटनमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या मॅरेथॉन बैठका
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री महत्त्वाची बैठक बोलावली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संघटन मंत्री बीएल संतोष पंतप्रधानांच्या बैठकीत उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची तीन विभागात विभागणी करून काम करण्यावर चर्चा झाली. प्रत्येकाने आपापल्या भागात आणि सरकारच्या योजना लोकांमध्ये घेऊन जाव्या, असा स्पष्ट संदेश पीएम मोदींनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही मोदींनी दिले आहेत.
कोणत्या गटात कोणते राज्य?
पूर्व गटात भाजपने ईशान्येकडील आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहार या राज्यांचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे पक्षाने जम्मू आणि काश्मीर, लडाख, दमण आणि दीव, दादरा नगर हवेली आणि दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश उत्तर गटात ठेवले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान, गुजरात या राज्यांनाही उत्तर गटात मध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?
दक्षिण भागात केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा तसेच अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश ठेवले आहेत. देशाची तीन भागात विभागणी करून काम करण्याची भाजपची रणनीती लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचे सांगितलं जात आहे. सूक्ष्म पातळीवर जाऊन पक्षाचे संघटन मजबूत करणे हाच पक्षाचा मुख्य अजेडा असल्याचे म्हटले जात आहे.
नड्डा घेणार खासदारांची बैठक
भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही पक्षाच्या सर्व खासदारांसोबत बैठक घेऊ शकतात, सांगण्यात येतंय. जेपी नड्डा यांची खासदारांसोबत 4 जुलै रोजी बैठक होऊ शकते, अशी माहिती आहे. या बैठकीत मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पक्षातर्फे राबविण्यात येत असलेल्या जनसंपर्क अभियानात खासदारांच्या सहभागाबाबतचा आढावा घेतला जाऊ शकतो.
हेही वाचा >> Madhya Pradesh : ‘या’ ओपिनियन पोलने भाजप-काँग्रेसचं टेन्शन वाढवलं! आकड्यांचा खेळ काय?
भाजपने सर्व खासदारांना या मोहिमेदरम्यान केलेल्या कामांची माहिती नमो अॅपवर अपलोड करण्यास सांगितली आहे. याच माहितीच्या आधारे पक्ष सर्व खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करणार असल्याची माहिती आहे. या रिपोर्ट कार्डच्या आधारे खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. भाजप खासदारांच्या सोशल मीडियावरील सक्रियतेबद्दलचे रिपोर्ट कार्डही तयार करत आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजप खासदारांच्या या रिपोर्ट कार्डला तिकीट वाटपाचा आधार बनवणार असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT