Ayodhya, Babari Masjid :
ADVERTISEMENT
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणासाच्या मनात कायमच श्रद्धा राहिली आहे. त्यामुळे त्यांचा अपमान केला हा आरोप मी सहन करणार नाही. हे पाप माझ्या हातून कधीच होणार नाही. बाबरीचा ढाचा पाडताना जे होते ते सर्व शिवसेना किंवा भाजप म्हणून नव्हते तर हिंदू म्हणून होते, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात होते, असं म्हणतं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते पुण्यात बोलत होते. (BJP Minister Chandrakant Patil clarification on Ayodhya, Babari Masjid and Shiv Sena conflict)
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक विधान केलं. यावरुन सध्या महाराष्ट्रात जोरदार वाद सुरु आहे. “ढाचा पडल्यानंतर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय, बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते का, शिवसेना तिथे गेली होती? असं म्हणतं तुम्ही काय तुमचे चार सरदार पाठवले होते का तिथे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. याचवरुन सध्या वादविवाद सुरु आहे. पाटील यांच्या विधानानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याचं म्हणतं शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा संबंध नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
चंद्रकांत पाटील यांनी काय दिलं स्पष्टीकरण?
अयोध्या आणि राम जन्मभूमीचे आंदोलन 1983 पासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात सुरु झाले होते. सदासर्वकाळ ते विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या नेतृत्वातच चालले. त्यामुळे बाबरीचा ढाचा पाडतानाही कोणीही शिवसेना किंवा शिवसैनिक म्हणून नव्हते. अगदी भारतीय जनता पक्ष म्हणूनही नव्हते. ते सर्वजण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली एकत्र होते. सर्व जण हिंदू म्हणून त्या आंदोलनात सहभागी होते. शिवसेनेतून सतीश प्रधानांपासून अनेक जण तिथं उपस्थित होते. आनंद दिघे यांनी सोन्याची वीट पाठवली होती.
शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर…; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अपमानाच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणासाच्या मनात कायमच श्रद्धा राहिली आहे. बाळासाहेबांमुळे मुंबईतील हिंदू जिवंत राहिला. मी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांचा ऋणी राहिलो आहे. मातोश्रीशी संबंधित राहिलो आहे. त्यामुळे त्यांचा अपमान केला हा आरोप मी सहन करणार नाही. हे पाप माझ्या हातून कधीच होणार नाही. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात लहानपणीपासून आदर आहे. तसाच तो मातोश्रीशीही आहे. उद्धव ठाकरेंशीही जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ते काय म्हणाले, यावर मी टिपण्णी करणार नाही. बाळासाहेबांचे हिंदू माणसांवरील ऋण कोणीच विसरु शकत नाहीत, असेही पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT