Firing on Shiv Sena UBT leader Abhishek Ghosalkar: मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता शिवसेना (UBT)ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील दहिसर भागात मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अभिषेक घोसाळकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या बोरीवलीमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (firing on shiv sena former corporator abhishek ghosalkar seriously injured in the attack mumbai crime)
ADVERTISEMENT
अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या घटनेनंतर परिसरात बरंच तणावाचचं वातावरण आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मॉरिस भाई याने स्वत:च्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. मॉरिसने त्याच्या कार्यालयातच अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात गोळीबाराच्या घटना घडत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. मुंबईत देखील अशीच घटना घडल्याने आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिषेक घोसाळकर यांना हल्लेखोर मॉरिस याने एका कार्यक्रमासाठी आपल्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यानंतर तिथेच त्याने हा जीवघेणा हल्ला केला.
मारेकरी मॉरिसने स्वत:वरही झाडल्या गोळ्या
मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वत:वर देखील 4 गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. पण या हल्ल्यामागचं नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.
'यांचे गँग लीडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री'
दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केली आहे.
आताच मला ही बातमी कळली की, आमचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. हाच मुद्दा आहे की, हे सगळं किती दिवस सहन करायचं? यामध्ये महाराष्ट्र देखील बदनाम होत आहे. लोकांना भीती आहे आणि आता ती दिसत देखील आहे.
अशामुळे उद्योजक देखील महाराष्ट्रात येणार नाही. अशी परिस्थिती या सगळ्यामुळे निर्माण झाली आहे.
हा जो गुंडाराज चालू आहे.. त्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे गँग लीडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. तिथेच मूळ महाराष्ट्राची अडचण झाली आहे. कारण या सगळ्यांना वाचवतायेत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री.
दरम्यान, या सगळ्या घटनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. त्यामुळे आता या सगळ्यात शिंदे सरकार आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारची कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT